Samruddhi Highway : पुण्याशी जोडला जाणार समृद्धी महामार्ग, कसा असेल ५३ किलोमीटर लांबीचा हायवे, मुख्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती…
Samruddhi Highway : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने समृद्धी महामार्ग पुण्याशी जोडला जाण्याची माहिती दिली आहे. या योजनेअंतर्गत पुणे आणि शिरुर दरम्यान ५३ किलोमीटर लांबीचा महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. हा मार्ग अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगरमार्गे समृद्धी महामार्गाला जोडला जाईल.
एवढा येणार खर्च..
हा नवा महामार्ग केसनंद गावातून सुरू होऊन शिरुरपर्यत जाईल. या मार्गासाठी ७५१५ कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्याशिवाय हा महामार्ग अहमदनगरवरुन समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी अतिरिक्त २०५० कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या दोन्ही महामार्गांसाठी एकत्रित ९५६५ कोटी रुपये खर्च येणार आहे. या महामार्गाची एकूण लांबी २५० किलोमीटर इतकी असेल.
दरम्यान, सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. या मार्गाअंतर्गत पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा राष्ट्रीय महामार्ग आधी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात ‘एनएचएआय’ बांधणार होता. मात्र आता तो महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, ‘एमएसआयडीसी’ अंतर्गत बांधला जाणार आहे. Samruddhi Highway
एप्रिलमध्ये झालेल्या करारानुसार हा प्रकल्प ‘एमएसआयडीसी’कडे सुपूर्द करण्यात आला असून आता त्यावर वेगाने काम सुरू करण्यात येणार आहे. या महामार्गामुळे पुणे आणि छत्रपती संभाजीनगर यांच्यातील कनेक्टिव्हिटी सुधारेल. तसंच या भागाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासालाही नवी उंची मिळणार आहे.