पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सागर भोसले यांचे दुःखद निधन

इंदापूर : येथील पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सागर भोसले यांचे निधन झाले आहे. भोसले हे जिल्हा परिषद सदस्य म्हणून सणसर-लासुर्णे गटातून २०१७ ते २०२२ पर्यंत व सध्या काळजीवाहू सदस्य म्हणून कार्यरत होते. त्यांच्या जाण्याने इंदापूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सागर भोसले हे आजारपणाने त्रस्त होते. आजारपणावर मात करुन ते राजकारणात सक्रिय होतील अशी अपेक्षा असताना त्यांची मृत्यूची झुंज व्यर्थ ठरली आहे. ते ३५ वर्षाचे होते. भोसले हे जिल्हा परिषद सदस्य म्हणून सणसर-लासुर्णे गटातून निवडून आले होते. अत्यंत लहान वयामध्ये त्यांनी युवकांमध्ये आपला वेगळा ठसा निर्माण केला होता. त्यांच्या जिल्हा परिषदेच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी आपल्या गटासह इतरही परिसरामध्ये विकास कामे केली होती.
त्यांनी युवकांची मोठी फळी निर्माण केली होती. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, एक मुलगा असा मोठा परिवार आहे. राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या गटातून त्यांनी ही जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती.
चिखली फाटा नजीक आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अचानक त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे.