पुणे जिल्ह्यात आठ ठिकाणी ‘रोप वे’ मंजूर, सिंहगडसह आणि आणखी दोन किल्ल्यांचा समावेश, जाणून घ्या..

पुणे : गेल्या काही दिवसांपासून विविध जिल्ह्यांमधील मंदिरे, गड किल्ले तसेच दुर्गम ठिकाणी असलेल्या पर्यटन स्थळी रोप वे करण्याची मागणी केली जात होती. यामुळे आता सरकारने याबाबत निर्णय घेतला आहे. सरकारने राज्यात ४५ ठिकाणी रोप वे करण्याच्या प्रस्तावाला नुकतीच मान्यता दिली आहे.
यामध्ये पुणे जिल्ह्यातील पर्यटनदृष्ट्या सर्वाधिक गर्दीची ठिकाणे, डोंगराळ प्रदेश आणि दुर्गम भागांना जोडण्यासाठी जिल्ह्यात आठ ठिकाणी ‘हवाई रज्जू मार्ग प्रकल्प’ (रोप वे) उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामध्ये सिंहगड किल्ल्यासह शिवनेरी, राजगड या किल्ल्यांसह जेजुरी, निमगाव खंडोबा, लेण्याद्री, भीमाशंकर या ठिकाणी ‘रोप वे’ करण्यात येणार आहे.
यामुळे पर्यटकांसह भाविकांना अवघ्या काही मिनिटांत मंदिरासह गड-किल्ल्यांवर पोहोचणे शक्य होणार आहे. पुणे जिल्ह्यातील आठपैकी तीन ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि उर्वरित पाच ठिकाणी ‘राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लि. यांच्यावर ‘रोप वे’ची जबाबदारी दिली आहे. यामुळे लवकरच कामाला गती मिळणार आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर यांनी सांगितले की, कोणत्या ठिकाणचे ‘रोप वे’ कोणी करायचा याबाबत फक्त निर्णय झाला आहे. त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. खंडोबा निमगाव येथील ‘रोप वे’ पूर्वीच मंजूर असून, त्यासाठी सुमारे ३३ कोटी रुपये मंजूर आहेत.
दरम्यान, रोप वे प्रकल्पाची जागा ही बांधकाम विभागाची असल्यास त्यांनी ३० वर्षासाठी ‘एनएचएलएमएल’ कंपनीला भाडेपट्ट्याने द्यावी. इतर विभागाची जागा असल्यास त्यांच्याकडून हस्तांतरित करून घ्यावी. त्यानंतर ती जागा बांधकाम विभागाने ३० वर्षाच्या भाडेपट्ट्याने द्यावी. ‘रोप वे’ उभारण्यामध्ये सरकारचा समभाग असेल.
पर्यटनाला चालना देण्यासाठी रोप वे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कामासाठी राज्य सरकार आणि ‘एनएचएलएमएल’ यांच्याशी गेल्या वर्षी करार करण्यात आला होता. राज्यातील ‘रोप वे’ ची कामे ‘एनएचएलएमएल’ मार्फत करण्यासाठी सहकार्य देण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. यामुळे येणाऱ्या काळात ही कामे सुरु होतील, अशी अपेक्षा आहे.