राज्य हादरलं! वर्गमित्रांकडूनच झाला विश्वासघात, विवाहितेला गुंगीचं औषध देत वारंवार अत्याचार, आक्षेपार्ह फोटो काढले अन्…

नागपूर : उपराजधानी नागपूरच्या सोनेगाव परिसरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका विवाहित महिलेवर तिघांनी वारंवार अत्याचार केल्याची गंभीर तक्रार नोंदवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आरोपी हे पीडितेचे ओळखीचे, तिचेच वर्गमित्र असल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी पीडितेला गुंगीचे औषध देऊन तिला हॉटेलमध्ये नेले आणि तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. त्यानंतर आरोपींनी पीडितेचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. हे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत त्यांनी तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचेही उघड झाले आहे.
या प्रकरणात केवळ शारीरिक अत्याचारच नाही तर पीडितेकडून पैसेही उकळण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. धमकी आणि ब्लॅकमेलच्या माध्यमातून आरोपींनी तिच्याकडून तीन लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम घेतली असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय, पीडितेवर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचाही आरोप आहे.

या प्रकरणात पीडित महिलेने अखेर धाडस करून सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अय्याज ताज मदारे आणि आमीन शेख या दोन आरोपींना अटक केली आहे. तिसरा आरोपी हजरत मौलाना हा सध्या फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. दोन्ही अटक आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
