बारामतीत दरोडेखोरांचा सुळसुळाट! एकाच दिवशी ९ घरांवर दरोडा, नागरिक घाबरले…

बारामती : बारामती शहरातील देसाई इस्टेट जवळ आणि बारामती शहरात एका रात्रीत चोरट्यांकडून तब्बल १५ ते १६ घरफोड्या झाल्याची घटना घडली.
यामध्ये सोने चांदी रोख रक्कम चोरीस गेल्याची माहिती मिळत आहे. चोरट्यांनी बंद घरे फोडली आहेत. या चोरीत जवळपास २५ तोळे सोने चांदी आणि १ लाख रुपये कॅश लंपास केली आहे.
बारामती शहर पोलिसांनी आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी केली. मात्र एकाच रात्रीत एवढ्या घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या बारामतीत चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून बारामतीत चोरीचे प्रमाण वाढले असल्याचे बोलले जात आहे. चोरांचे प्रमाणही वाढल्याचे चोरीच्या घटनांवरुन स्पष्ट होतं आहे. एकाच रात्रीत एक दोन नाही तर तब्बल १५ ते १६ घरे फोडल्याची घटना समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वी बारामतीतील शहरातील देवकाते नगर परिसरात देवकाते पार्क येथील एका घरात घुसून चोरट्यांनी ६३ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता. महत्वाचं म्हणजे चोरांनी थेट घरातील महिलेचे हात पाय बांधून ठेवले होते आणि त्यानंतर घरावर दरोडा टाकला होता.
जमीन खरेदीसाठी आणून ठेवलेली ५५ लाख रुपयांची रोख रक्कम तसेच सोन्याची चैन, मिनी गंठण, अंगठी, कर्णफुले, मोबाईल असा जवळपास ६३ लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला होता. या घटनेमुळे बारामतीत खळबळ उडाली होती.
दरम्यान, महिलेचे हातपाय बांधून चोरी करणे गंभीर बाब आहे. या घटनेनंतर एकट्या महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला होता. त्यासोबत पोलिसांच्या कामावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.