Raksha Khadse : एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये यावं, खासदार सून रक्षा खडसेंची विनंती, राज्यात लवकरच पुन्हा राजकीय धमाका होणार?
Raksha Khadse : राज्याचा राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक बड्या नेत्यांचे भारतीय जनता पक्षात इनकमिंग सुरु आहे. आता भाजपचे पूर्वाश्रमीचे नेते एकनाथ खडसे यांच्या घरवापसीची तयारी सुरु असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. याबाबत एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांनी सूचक वक्तव्य केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
रक्षा खडसे म्हणाल्या की, गेल्या काही दिवसांपासून अनेक मोठे भाजपामध्ये दाखल होत आहेत. एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये यावं ही आपली व सर्वांची इच्छा आहे. एकनाथ खडसे यांचा भाजपचा पक्षप्रवेश हा जरी वरिष्ठ पातळीचा निर्णय असला त्यावर एकनाथ खडसे यांच्या मनात काय हे सगळे घडल्यानंतरच आपल्यासमोर येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
रक्षा खडसे यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. आता एकनाथ खडसे हे लोकसभा निवडणुकीपूर्वी धमाका करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, गिरीश महाजन यांनीदेखील एकनाथ खडसे भाजपमध्ये परतण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे वक्तव्य केले आहे. एकनाथ खडसे भाजपमध्ये परतण्यासाठी फार जोर लावत आहेत, असे मला कळाले आहे. दिल्लीतून आणि राज्यातून या बातम्या माझ्यापर्यंत आल्या आहेत.
मला वाटतं तसं काही प्रयोजन नाही. मला अजूनतरी कोणीही एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये परत घ्यायचे किंवा नाही, याबद्दल विचारलेले नाही. मी छोटा कार्यकर्ता आहे. कदाचित एकनाथ खडसे यांची थेट वरुन हॉटलाईन असेल तर त्यांनी लावावी, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.