राज्यातलं शिंदे-फडणवीस-पवार सरकार लुच्चे, राजू शेट्टी सरकारवर संतापले…


मुंबई : आजचे सरकार लुच्चे, फसविणारे असून आपणाला ही व्यवस्था तोडून काढावी लागेल. शोषणमुक्त शेतकरी करण्यासाठी तुम्ही मला साथ द्या, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले.

पंतप्रधान मोदी, शिंदे, अजित पवार व फडणवीस यांना महाराष्ट्राचा विकास करण्याचा खूप ध्यास लागला असून शेतक-यांचे शोषण करणा-या या सरकारला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्याचा अधिकार नसल्याचा उपरोधिक टोलाही शेट्टी यांनी लगावला.

ते नेर्ले (ता. वाळवा) येथील विलासराव मल्टिपर्पज हॉलमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियानां’तर्गत आयोजित सभेत बोलत होते.

ते पुढे म्हणाले, ‘किल्ले रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने शेतकरी जनजागृती अभियानाला सुरुवात केली आहे. शंभर रुपयांची एफआरपी वाढवून मोदी सरकार स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे. परंतु ऊस शेतीसाठी प्रत्यक्ष खर्च सोडला तर शेतक-यांच्या हातामध्ये काहीच राहत नाही.

शेतक-यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. असे हातावर हात ठेवून जर थांबलात तर येणारे दिवस वाईट असल्याचा इशारा त्यांनी दिला. बांधावर बसून मी जो दर सांगेल तोच दर कारखान्याने द्यावा, अशी धमक शेतक-यांमध्ये तयार होणे गरजेचे आहे.

तलाठी, तहसीलदार, प्रशासन अधिकारी तुमच्या पैशातून पगार घेतात, तरीसुद्धा चिरीमिरीसाठी हात पसरतात. विकासकामे, रस्ते, पायाभूत सुविधा या तुमच्याच पैशातून होत आहेत.

मंत्री ठेकेदाराकडून दहा ते पंधरा टक्के घेतात आणि विकास कामे आम्हीच केली, असे छाती बडवून सांगतात. तेलंगणामधील बी. आर. एस.चे मंत्रिमंडळ पंढरपूरमध्ये आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करण्यासाठी आले होते का? असेही शेट्टी म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!