दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांची मोठी कारवाई; राजू शेट्टी, महादेव जानकरांसह हजारो जण ताब्यात, भारत-अमेरिका व्यापार करारावरून संघर्ष तीव्र

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिका यांच्यात प्रस्तावित मुक्त व्यापार कराराच्या (India-US Trade Deal) विरोधात देशभरातील शेतकरी संघटनांनी दिल्लीत आयोजित केलेल्या आंदोलनादरम्यान मोठा संघर्ष पाहायला मिळाला. ‘देश बचाओ मोर्चा’च्या नेतृत्वाखाली दिल्लीतील किसान घाट येथे धडक देण्यासाठी निघालेल्या हजारो शेतकऱ्यांना दिल्ली व हरियाणा पोलिसांनी विविध ठिकाणी अडवत मोठ्या प्रमाणावर ताब्यात घेतल्याने वातावरण चिघळले आहे.

या आंदोलनात देशभरातील 154 हून अधिक शेतकरी संघटना सहभागी झाल्या असून, महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, माजी केंद्रीय मंत्री महादेव जानकर तसेच राष्ट्रीय किसान मोर्चाचे नेते सरदार व्ही. एम. सिंह यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. राजघाट, किसान घाट आणि दिल्लीच्या सीमाभागात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, आंदोलनकर्त्यांना पुढे जाण्यापासून रोखण्यात आले.



पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि इतर राज्यांतून शेकडो वाहनांमधून शेतकरी दिल्लीकडे रवाना झाले होते. मात्र, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी रात्रीपासूनच राजधानीतील संवेदनशील भागांमध्ये नाकेबंदी केली. राजघाट आणि किसान घाट परिसराला अक्षरशः छावणीचे स्वरूप आले असून, आतापर्यंत सुमारे पाच हजारांहून अधिक शेतकऱ्यांना विविध ठिकाणांहून ताब्यात घेऊन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये हलविण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
हरियाणा पोलिसांनी पंजाब-हरियाणाला जोडणारे शंभू आणि खनौरी सीमाबिंदू पूर्णपणे बंद केले आहेत. अंबाला परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असून, अतिरिक्त पोलीस व सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे दिल्लीकडे जाणाऱ्या शेतकरी वाहनांची मोठी कोंडी निर्माण झाली.
आंदोलनादरम्यान राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत प्रस्तावित व्यापार करारामुळे भारतीय शेती आणि दुग्ध व्यवसायावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली. अमेरिकेतील कृषी क्षेत्राला मोठ्या प्रमाणात सरकारी अनुदान मिळत असल्याने तेथील स्वस्त कृषी व दुग्धजन्य उत्पादने भारतीय बाजारात आल्यास देशातील लहान व मध्यम शेतकरी स्पर्धेत टिकू शकणार नाहीत, असा दावा त्यांनी केला. सरकारने पोलिसांचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तरी शेतकरी मागे हटणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, दिल्लीपासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावरील पानिपत परिसरातील राजीव गांधी स्टेडियम तसेच काही पोलीस ठाण्यांमध्ये अनेक आंदोलनकर्त्यांना ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शेतकरी संघटनांच्या समन्वय समितीने ताब्यात घेतलेल्या सर्व आंदोलनकर्त्यांची तातडीने सुटका करण्याची मागणी केली असून, तसे न झाल्यास देशभर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
भारत-अमेरिका मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या आंदोलनामुळे आगामी काळात केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
