महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार, पुण्यासह ७ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! जाणून घ्या….

पुणे : राज्यातील कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात पावसाचा जोर कायम आहे. हवामान विभागाने या पार्श्वभूमीवर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाट परिसर आणि नाशिक घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
उर्वरित राज्यात देखील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी पडणार असल्यामुळे यलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जुलैपासून कोकण व घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे
.
विशेषतः घाटमाथ्याच्या परिसरात अतिवृष्टीचे संकेत मिळत असून नागरिकांनी सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर येण्याचा धोका असल्याने प्रशासन सज्ज असल्याचेही सांगण्यात आले.
राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, नाशिक व कोल्हापूर घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. या सातही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, मुंबई, ठाणे, पालघर, धुळे, जळगाव, चंद्रपूरसह इतर भागांमध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार सरींची शक्यता असल्यामुळे यलो अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात जून महिन्यात तब्बल २,५१५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ही आकडेवारी चक्क चेरापुंजीच्या १,००० मिमी पेक्षा अधिक आहे. लोणावळा व मुळशीसह घाटमाथ्याच्या इतर भागांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे. या जोरदार पावसामुळे स्थानिक जनतेच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
मे-जून महिन्यांत नंदुरबार जिल्ह्यात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. जिल्ह्यात ८०० हून अधिक घरांचे नुकसान झाले असून, ७५१.६२ आर शेतीचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, शासनाकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. प्रशासनाने या कुटुंबांना तातडीने मदत मिळावी यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.