महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचं संकट की वरदान? मान्सून माघारी फिरला, पण 24 जिल्ह्यांना येलो अलर्ट; ‘या’ तारखांना जोरदार पाऊस


मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने अनेक भागांत उन्हाची काहिली जाणवत आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अपेक्षेइतका पाऊस न झाल्याने यंदा पावसाची तूट निर्माण झाली असून, काही भागांत दुष्काळाची चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, आता हवामानात पुन्हा मोठा बदल होण्याची शक्यता आहे. देशातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असला तरी महाराष्ट्रात पावसाचा मुक्काम अद्याप कायम आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी सोमवारी राजस्थानच्या काही भागांसह पंजाब आणि हरियाणाच्या काही भागातून माघार घेतली. यंदा मान्सूनने आपल्या नेहमीच्या वेळेपेक्षा दोन दिवस आधीच परतीचा प्रवास सुरू केला आहे. पुढील दोन दिवसांत वायव्य भारतातील आणखी काही भागांतून मान्सून माघारी फिरण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातून मात्र मान्सूनने पूर्णपणे माघार घेतलेली नाही. यामागे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा मोठा प्रभाव आहे. ही हवामान प्रणाली अधिक तीव्र होत असल्याने महाराष्ट्रात पावसासाठी पुन्हा पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील २४ जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुणे, सातारा आणि कोल्हापूरसह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे. नाशिक, अहिल्यानगर आणि जळगावसह मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांनाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.

दरम्यान, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पुढील २४ तासांत तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे माजी प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांच्या माहितीनुसार, या प्रणालीच्या प्रभावामुळे २३ ते २६ सप्टेंबरदरम्यान विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो.

याशिवाय, भारतीय हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार ही हवामान प्रणाली ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरून पुढे मध्य प्रदेशाच्या दिशेने सरकू शकते. ही प्रणाली अपेक्षेप्रमाणे पुढे सरकल्यास २५ ते २८ सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. या काळात विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.

त्यामुळे एकीकडे देशातून मान्सूनची माघार सुरू झाली असली, तरी महाराष्ट्रात मात्र परतीच्या पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पावसाची तूट भरून काढण्यासाठी हा पाऊस महत्त्वाचा ठरू शकतो. मात्र, मुसळधार पावसाची शक्यता असलेल्या भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!