मटका जुगाराच्या अड्ड्यावर छापा, तीन जणांना अटक, तर ७ जणांवर गुन्हा दाखल, लोणी काळभोर पोलिसांची कामगिरी..

लोणी काळभोर : खुलेआम सुरु असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांनी शनिवारी (ता.१५) साडेचार वाजण्याच्या सुमारास छापा टाकला आहे.
बेट वस्ती परिसरात केलेल्या या छाप्यात पोलिसांनी ७ जणांवर गुन्हा दाखल करून तीन जणांना अटक केली आहे. तर या कारवाईत सुमारे साडेचार हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
किरण मुरलीधर शेलार (वय.२५ रा. कुंजीरवाडी), नदीम महबूब मुलानी (वय.२२ रा.गाडीतळ हडपसर), सागर प्रमोद राजगुरू (वय 31रा. थेऊर, ता.हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
तर प्रकाश पवार (रा.लोणी स्टेशन), माऊली उर्फ ज्ञानेश्वर निवृत्ती राख पसरे (रा. बेट वस्ती, लोणी काळभोर), जुगल किशोर बद्रीनारायण (लड्डा रा. लातूर) रोहित भारत (रा.उरळी कांचन, ता.हवेली) यांच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे ४ गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार शैलेश कुदळे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात सरकारच्या वतीने फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, पोलीस अंमलदार शैलेश कुदळे हे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी कर्त्यव्य बजावीत होते. तेव्हा लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील बेट वस्ती परिसरात खुलेआम जुगार सुरु आहे. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्या मार्फत मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. तेव्हा वरील सात आरोपी त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे जुगार पैशांवर खेळत असताना मिळुन आले. पोलिसांनी या छाप्यात 3 जणांना अटक केली आहे. तर साडेचार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र पोलिस आल्याची चाहूल लागताच चार आरोपी फरार झाले आहेत. पोलिस आरोपींच्या मागावर आहेत.
दरम्यान, आरोपी माऊली राखपसरे याच्यावर याअगोदरही लोणी काळभोर, हडपसर व स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाराष्ट्र जुगार कायदा कलमाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच विवाहितेचा छळ केल्याचाही लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.