Pune : पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट २३ गावांना ‘यूडीसीपीआर’ लागू, बांधकाम प्रकल्पांना मिळणार गती…

Pune : राज्य शासनाने महापालिकेमध्ये समाविष्ट केलेल्या २३ गावांना एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (यूडीसीपीआर) लागू करण्याचा अध्यादेश जारी केला आहे. यामुळे गावांतील बांधकाम प्रकल्पांना गती मिळणार आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापुर्वी १५ मार्चलाच हा अध्यादेश काढण्यात आला आहे. युडीसीपीआरमुळे समाविष्ट गावांतील बांधकाम प्रकल्पांना गती मिळणार आहे.
राज्य शासनाने २०२१ मध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली लागू केली आहे. यामधील तरतुदींमुळे शहरांची वाढ ही ऊर्ध्व दिशेने होण्यास मदत होणार आहे.
यूडीसीपीआरनंतर पुणे शहराच्या जुन्या हद्दीमध्ये तसेच २०१७ मध्ये समाविष्ट केलेल्या गावांमध्ये गगनचुंबी इमारती उभ्या राहू लागल्या आहेत. मात्र, यूडीसीपीआर लागू करताना २०२१ मध्ये महापालिकेत समाविष्ट २३ गावांना ही नियमावली लागू नव्हती. Pune
ही गावे महापालिकेत असली तरी येथील बांधकामांना पीएमआरडीएकडूनच बांधकाम परवानगी देण्यात येत आहे. तसेच, या गावांचा विकास आराखडा देखील पीएमआरडीएनेच केला आहे.
दरम्यान, हा आराखडा अद्याप राज्य शासनाकडे पडून असून, त्याला मान्यता दिलेली नाही. मात्र, आराखडा मंजुरीपूर्वी राज्य शासनाने गावांना यूडीसीपीआर लागू केला आहे. त्यामुळे समाविष्ट गावांतील बांधकामांना अधिक वेग मिळणार आहे.