Pune : तळेगाव-चाकण -शिक्रापूर उन्नती महामार्ग विकसासाठी निविदा प्रसिद्ध! ‘एनएचआयए’ ने किती रक्कमेची काढली निविदा?, जाणून घ्या…

Pune : तळेगाव-चाकण-शिक्रापूर ५४८-डी या राष्ट्रीय महामार्गासह पुणे ते शिरूर आणि नाशिक फाटा ते खेड या तीन उन्नत महामार्गाचे टेंडर पटलावर झळकले आहेत. वारंवार होणारे अपघात आणि वाहतूक कोंडीमुळे प्रलंबित महामार्गाच्या कामास अखेर मुहूर्त लागला आहे.
पाच वर्षांपूर्वी तळेगाव – चाकण शिक्रापूर रस्ता ५४८ डी हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला. त्यानंतर कोटींच्या निधीच्या कागदी घोषणा झाल्या. मात्र, गतवर्षीपासून भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने त्रयस्थ सल्लागार संस्थेमार्फत महामार्गाचे सर्वेक्षण करून विस्तृत प्रकल्प अहवाल मंजुरीसाठी सादर केला होता. Pune
त्यास मंजुरी मिळाल्यानंतर प्राधिकरणाने तत्परता दाखवत गेल्या २१ डिसेंबरला या महामार्गाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.काम लवकरच सुरू होण्याच्या आशेने तळेगाव – चाकण – शिक्रापूर महामार्गालगतच्या नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
अस्तित्त्वातील तळेगाव – चाकण टप्प्यातील २५ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे बांधा, वापरा हस्तांतरित करा, या तत्त्वावर चौपदरीकरण करून त्यावर चौपदरी उड्डाणपूल बांधण्याच्या कामाची २,४५५.७८ कोटी रुपयांची निविदा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने प्रसिद्ध केली आहे.
तसेच चाकण ते शिक्रापूर टप्प्यातील २८ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे चौपदरीकरण करून त्यावर चौपदरी उड्डाणपूल बांधण्याच्या कामाची २,७७८.५३ कोटी रुपयांची निविदा प्राधिकरणाने प्रसिद्ध केली आहे.
“कित्येक वर्षे रखडलेल्या तळेगाव – चाकण – शिक्रापूर महामार्गाच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू केल्याबद्दल रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे आम्ही आभार मानतो. श्रेयवादात न पडता राजकीय मंडळींनी काम कसे सुरू करता येईल, यासाठी पाठपुरावा करावा.”
नितीन गाडे, अध्यक्ष, तळेगाव चाकण महामार्ग कृती समिती