Pune : आता बोगस नोंदणीप्रकरणी जुन्या दस्तांची तपासणी, महसूल मंत्र्यांकडे तक्रारी केल्यानंतर प्रशासन लागले कामाला…

Pune : पुणे शहरासह जिल्ह्यात मागील अडीच वर्षांपूर्वी बोगस दस्तनोंदणीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सुमारे ४४ दुय्यम निबंधकांना घरचा रस्ता दाखवला होता. हे प्रकरण होत नाही, तोच पुन्हा पुणे शहरात बोगस दस्तनोंदणी केल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे मुंबई-पुण्यासह नव्याने नोंदवण्यात आलेल्या दस्तांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.
त्यासाठी स्वतंत्र पथक नेमण्यात आले आहे. राज्यात गेल्या काही वर्षांपासून बोगस दस्त नोंदल्याच्या तक्रारी प्राप्त होत असून, अनेक दुय्यम निबंधकांकडून सरकारी तिजोरीवरच डल्ला मारल्याचे प्रकार उघडकीस आले. तपासणीअंती सुमारे १० हजार बोगस खरेदीखतांची नोंदणी करणाऱ्यांमध्ये ४४ दुय्यम निबंधक आणि लिपिक दोषी आढळले होते.
त्या सर्व दोषींवर कारवाई करून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात येऊन त्यांची निम्म्या पगारावर विदर्भ, मराठवाडा या भागात बदली करण्यात आली होती. मात्र काही दिवसांत अनेक अधिकाऱ्यांना पुन्हा पुण्यातल्या सेवेत घेण्यात आले. त्यामुळे पुन्हा बोगस नोंदणी झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. Pune
त्यामुळे राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क महानिरीक्षक यांना पुणे आणि मुंबईमधील सर्व दस्तनोंदणी कार्यालयांतील नव्याने नोंदण्यात आलेल्या दस्तांसहित मागील पाच वर्षांपर्यंतच्या नोंदलेल्या दस्तांची तपासणी करावी, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार नागपूर येथील एक पथक दुतोंडे या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात दाखल झाले आहे.
या तपासणी पथकात सुमारे १३ सदस्य असून, या पथकाने दापोडी येथील ‘हवेली-१७’ या दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्तांची तपासणी सुरू केली असल्याचे दस्तनोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
महसूलमंत्र्यांकडे तक्रारी..
पुणे शहरात सुमारे २७ दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. अडीच वर्षांपूर्वी या कार्यालयामधील बोगस दस्तनोंदणीचा गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर ४४ दुय्यम निबंधकांना निलंबित केल्यानंतर त्यांच्या जागी प्रभारी म्हणून कनिष्ठ दर्जाचे कारकून (लिपिक) काम पाहत आहेत. या कारकुनांनीदेखील चुकीचा कारभार सुरू केल्याच्या तक्रारी महसूलमंत्र्यांकडे केल्या होत्या.