आगामी काळात पुणे रेल्वेस्थानकाची क्षमता दुप्पट होणार; बुलेट ट्रेन, वंदे भारत ट्रेनने मुख्य शहरांना जोडणार;
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची पुण्यात माहिती..

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रेल्वेसेवेचा शुभारंभ करण्यात आला. पुण्याची मोठी लोकसंख्या पाहता येथे मेगा टर्मिनस उभारणीच्या कामाला प्रारंभ करण्यात येत आहे. यासह पुणे रेल्वे स्थानक येथे ६ नवीन प्लॅटफॉर्म बनविण्यात येणार असून अस्तित्वातील ६ प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्यात येणार असल्याने रेल्वे हाताळणीची क्षमता दुप्पट होईल, अशी माहिती रेल्वेमंत्री वैष्णव यांनी यावेळी दिली.

पुणे रेल्वे स्थानकात यार्डची रिमॉडेलिंगची पायाभरणी यावेळी श्वैष्णव यांच्या हस्ते करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार दूरदृष्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले. पुणे स्थानक येथे केंद्रीय नागरी विमानवाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, आमदार विवेक कोल्हे, मध्य रेल्वेचे महाप्रबंधक राजीव श्रीवास्तव, पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा आदी यावेळी उपस्थित होते.
केवळ पुणे जंक्शनच नव्हे तर पुणे परिसरातील खडकी, पुणे, हडपसर, शिवाजीनगर, घोरपडी, हडपसर, फुरसुंगी, आळंदी या सर्व क्षेत्राला केंद्रस्थानी ठेऊन रेल्वेचा विकास करण्यात येत आहे, असे सांगून श्री. वैष्णव म्हणाले, पुण्याची लोकसंख्या ७० लाखाच्या वर असल्याने येथे एक मेगा कोचींग टर्मिनलची आवश्यकता आहे. त्यामुळे रेल्वेच्या आळंदी येथील जागेवर मेगा टर्मिनलचे काम हाती घेतले असून नवीन ९ प्लॅटफॉर्म बनविण्यात येणार आहेत. तसेच तसेच मालवाहतुकीच्या ७ फ्रेटलाईन्स, १७ स्टॅबलिंग लाईन बनविण्यात येत आहेत. फुरसुंगी येथे नवीन ५ स्टॅबलिंग लाईन्स तयार करण्यात येत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, पुण्यात ६०० कोटी रुपयांच्या विकास कामांतर्गत ६ प्लॅटफॉर्म नवीन बनविण्यात येणार असून अस्तित्वातील ६ प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्यात येणार आहे. याप्रकारे १२ प्लॅटफॉर्म होतील. पुणे रेल्वे स्थानक येथील रेल्वेचे कार्यान्वयन अर्थात ऑपरेशन कंट्रोल जुन्या प्रणालीवर असून त्याऐवजी पूर्णतः डिजिटल प्रणालीवर होणार आहे.

पुणे रेल्वे स्थानकात प्रवेशासाठी सध्या दोन ठिकाणे (एंट्री) असून तिसरी एन्ट्री तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे गर्दीचे नियमन योग्य प्रकारे होऊ शकेल. आळंदी येथे मेगा कोचिंग टर्मिनल बनल्यामुळे गाड्याच्या स्वच्छता, देखभाल दुरुस्तीचे काम पुण्यातून तेथे स्थलांतरीत होईल. त्यामुळे आळंदी येथून आवश्यक ती स्वच्छता, देखभाल आदी तयारी होऊन रेल्वेगाड्या पुणे रेल्वे स्थानकाची रेल्वे हाताळणीची क्षमता दुप्पट होणार असून येथून अतिरिक्त २० गाड्या चालविल्या जाऊ शकतील. हे काम येत्या ३ वर्षात पूर्ण केले जाईल, अशी माहितीदेखील श्री. वैष्णव यांनी यावेळी दिली.
बुलेट ट्रेन्समुळे मुंबई, पुणे, हैदराबाद, अहमदाबाद, आर्थिक कॉरिडॉर बनणार
मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा पुढील वर्षात कार्यान्वित होणार आहे. तसेच मुंबई ते पुणे व पुणे ते हैदराबाद या दोन नवीन बुलेट ट्रेन कॉरिडॉरचा पुण्याला लाभ मिळणार आहे. बुलेट ट्रेनमुळे पुणे मुंबई प्रवास ४८ मिनिटात प्रवास होईल. ज्यामुळे दोन शहरे ट्वीन शहरे होतील. तसेच पुणे ते हैदराबाद अंतर २ तास ८ मिनिटात गाठता येईल. या बुलेट ट्रेनमुळे मुंबई, पुणे, हैदराबाद, अहमदाबाद, सूरत, वापी, ठाणे हे आर्थिक कॉरिडॉर बनेल.
पूर्वी महाराष्ट्रातील रेल्वेच्या प्रकल्पांसाठी केवळ १ हजार १०० कोटी रूपयांची अर्थसंकल्पीय तरतूद होती. ती आज सुमारे २० पटींनी वाढवून २३ हजार ९०० कोटी रूपयांवर नेण्यात आली आहे. राज्यात गेल्या 12 वर्षात मलेशिया देशापेक्षा अधिक रेल्वे ट्रॅक तयार झाले आहे, असे श्री.वैष्णव यांनी सांगितले.
राज्यात १३२ रेल्वे स्थानकांचे नवनिर्माण सुरू
पुणे ते मुंबईदरम्यान तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गिकेचे काम लवकरच मार्गी लागेल, असे सांगून श्री. वैष्णव पुढे म्हणाले, राज्यात १३२ रेल्वे स्थानकांचे नवनिर्माण होत आहे. त्यापैकी पुणे जिल्ह्यातील हडपसर, चिंचवड, आकुर्डी, बारामती, उरूळीसह राज्यातील १९ स्थानकांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे गतीने सुरू आहेत. पुणे- नाशिक रेल्वेमार्गातील तांत्रिक अडचण दूर केली असून अहिल्यानगर- शिर्डी व पुढे नाशिक अशी रेल्वे मार्गिका करण्यात येणार आहे. तसेच चाकणच्या जोडणीबाबतही मार्ग काढण्यात आला असून लवकरच याबाबतही काम हाती घेण्यात येईल.
बेंगळुरू-पुणे- मुंबई वंदे भारत स्लीपर लवकरच सुरू होणार
देशात वंदे भारत स्लीपर मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात येणार आहेत. राज्यात २४ वंदे भारत रेल्वे, १४ अमृत भारत रेल्वे सुरू असून आगामी काळात बेंगळुरू ते पुणे ते मुंबईला जोडणारी वंदे भारत स्लीपर सुरू करण्यात येईल. लातूर येथे वंदे भारत स्लीपर बनविण्याचे काम गतीने सुरू असून लवकरच वंदे भारत स्लीपर रेल्वेचा शुभारंभ करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ म्हणाले, ही रेल्वेसेवा म्हणजे पुणे, अहिल्यानगर, शिर्डी या केंद्रांना विकासाच्या धाग्याने जोडणारा दिवस आहे. पुणे व परिसरातून शिर्डीला दर्शनासाठी जाणाऱ्या साईभक्तांसाठी ही रेल्वेसेवा उपयुक्त ठरणार असून ही रेल्वेसेवा श्रद्धा, शिक्षण, रोजगार, विकास यांना जोडणारा मार्ग आहे. अहिल्यानगर पुण्यात शिक्षणासाठी असलेले हजारो विद्यार्थी, व्यावसायिक, माहिती तंत्रज्ञान, वाहनउद्योग तसेच सेवा क्षेत्रात काम करणाऱ्यांना, पुण्यात वैद्यकीय उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना या सेवेचा उपयोग होणार आहे. हा धार्मिक, सामाजिक, आर्थिक कॉरिडॉर तयार झाला आहे.
या रेल्वेमुळे पुणे नगर महामार्गावरील वाहतुकीचाही ताणही कमी होणार आहे. पुणे रेल्वेस्थानकासाठी ६०० कोटी रुपयांची विकासकामे होणार आहेत. नवीन ६ प्लॅटफॉर्म तयार झाल्यानंतर येथे रेल्वे वाहतूक सुरळीत केल्यानंतर स्थानकाचे देखील नवीन बांधकाम होणार आहे. महाराष्ट्रात केंद्र शासनाच्यावतीने २ लाख कोटी रुपयांची विकास कामे सुरू आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील, भारतातीलच नव्हे तर जगातील नागरिक शिर्डीच्या साईबाबाशी जोडलेले आहेत. शिर्डीला विमानतळ झाले आहे परंतु सर्वसामान्यांची शिर्डीसाठी पुण्यातून कायमस्वरूपी रेल्वे सुरू व्हावी अशी मागणी होती. ती मागणी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी पूर्ण केली आहे.
पुण्यातून देशातील अनेक भागात रेल्वे जातात. त्यामुळे अधिक प्लॅटफॉर्मची गरज होती. त्या अनुषंगाने येथे ७ ते १२ असे नवीन प्लॅटफॉर्म सुरू होणार आहेत. त्याचा लाभ प्रवाशांना लाभ होईल. राज्यात रेल्वे मोठ्या प्रमाणात सुरू केल्या आहेत, स्थानकांचा चांगला विकास होत आहे. देशाचे प्रधानमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात अनेक पायाभूत प्रकल्प सुरू आहेत, असेही श्री. पाटील म्हणाले.