Pune : पुण्यात बनणार सव्वादोन लाख रेडिमेड मोदक, लाडक्या बाप्पांसाठी पुणेकर सज्ज…

Pune : सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला आवडणारं खाद्य म्हणजेच मोदक आहे. गणेशोत्सवा दरम्यान मोदकाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. पूर्वी खव्याचे, मिठाई पासून बनवलेल्या मोदकांना ग्राहकांकडून मागणी असते.
यंदा गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पुण्यात दोन लाखांहून अधिक हातवळणीचे उकडीचे मोदक तयार केले जाणार असल्याचे ऐकून आनंद होईल… हो, हे खरंय… यंदा उत्सवात मोठ्या प्रमाणात मोदकांसाठीची ऑर्डर व्यावसायिकांना मिळाली असून, एक व्यावसायिक पहिल्या दिवशी अंदाजे एक ते दोन हजार मोदक तयार करणार आहेत.
यावर्षी सुमारे दीड हजार व्यावसायिक मोदक तयार करण्याच्या व्यवसायात उतरले आहेत. गणरायाचा आगमनाचा दिवस उकडीच्या मोदकांनी गोड होणार आहे. उत्सवानिमित्त व्यावसायिकांकडे मोदकांसाठीचे बुकिंगही झाले असून, उत्सवात दहाही दिवस नैवेद्यासाठी, प्रसादासाठी व्यावसायिकांना बुकिंग मिळाले आहे.
गणेशोत्सवात श्री गणेश मूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशी हातवळणीच्या उकडीच्या मोदकांना मोठी मागणी असते. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश मंडळे, सोसायट्या आणि घरगुती गणपतीसाठी मोदकांसाठीची ऑर्डर व्यावसायिकांना प्राप्त झाल्या आहेत. काही महिला व्यावसायिक घरगुती स्तरावर हा व्यवसाय करत आहेत, तर काही जणी वर्षभर मोदक विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. महिला व्यावसायिक आपले कौशल्य वापरून हातवळणीचे उकडीचे मोदक तयार करीत आहेत. Pune
उत्सवाला अवघे तीन ते चार दिवस उरले असून, पहिल्या दिवशी बाप्पाच्या आगमनानिमित्त प्रसादासाठी लागणार्या मोदकांसाठीची तयारी व्यावसायिकांनी आणि त्यांच्याकडील महिला कर्मचार्यांनी सुरू केली आहे. मोदकांसाठीचे सारण सध्या तयार केले जात आहे. महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार म्हणाले, हातवळणीच्या उकडीच्या मोदकांना यंदाही चांगली मागणी आहे.
आता पुण्यात व्यावसायिकांची संख्या वाढली आहे. शुक्रवारी (ता.६) मध्यरात्रीपासून हातवळणीचे उकडीचे मोदक तयार करण्यास व्यावसायिक सुरुवात करतील. उत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच शनिवारी (ता.७) सकाळी मोदक ऑर्डरप्रमाणे दिले जातील. पहिल्या दिवशी आम्हीसुद्धा २५ हजार मोदक तयार करणार आहोत.