Pune News : लग्न करून आनंदाने सासरी आली, पण नवऱ्याचं खरं रूप समोर आलं; अवघ्या 3 महिन्यांत विद्याचा दुर्दैवी अंत

पुणे : सुखी संसाराची स्वप्ने घेऊन सासरी आलेल्या २५ वर्षीय नवविवाहितेचा लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांत दुर्दैवी मृत्यू झाला. पती आणि सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ केला जात असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. ही घटना हडपसरमधील फुरसुंगी परिसरात घडली.
विद्या अमोल तेलंग (वय २५) हिचा विवाह मे २०२६ मध्ये अमोल ज्ञानोबा तेलंग (वय २८, रा. पापडे वस्ती, फुरसुंगी) याच्यासोबत झाला होता. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच माहेरहून सोन्याचे दागिने आणि रोकड आणण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला जात असल्याचे कुटुंबीयांनी तक्रारीत म्हटले आहे.

पती अमोल, सासू आणि दीर यांच्याकडून विद्याचा छळ होत असल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. ९ ऑगस्ट रोजी विद्याचा राहत्या घरी मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.


वडिलांच्या तक्रारीनंतर पतीला अटक
विद्याचे वडील संभाजी वडनमवार यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करत हुंड्यासाठी मुलीचा छळ करून तिला टोकाचे पाऊल उचलण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केला. तक्रारीच्या आधारे फुरसुंगी पोलिसांनी पती अमोल तेलंग याला अटक केली आहे.
तसेच सासू आणि दीराविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच नवविवाहितेचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.