Pune News : पुणे रेल्वे स्टेशनवर उभ्या डब्याला भीषण आग, कारण अद्याप अस्पष्ट..

Pune News पुणे : पुणे रेल्वे जंक्शन यार्डातील एका रिकाम्या डब्याला आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, या घटनेत आजूबाजूच्या इतर दोन डब्यांचेही नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या चार गाड्या आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आहे.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण अजून समजू शकलेलं नाही. ही घटना १३ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १ वाजून ५८ मिनिटांनी घडली. कंप्रेसर रूम क्रमांक ४ रेल्वेजवळ ही घटना घडली असून परिसरात असलेल्या तीन डब्यांपैकी एका डब्याला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. अनेक दिवसांपासून हे डबे या ठिकाणी पडून आहेत.
अग्निशमन दलाच्या जवानांनी आधी वीजपुरवठा खंडित केला आणि त्यानंतर आग आटोक्यात आणण्यास सुरुवात केली. ३० मिनिटांत आग विझवण्यात आली. दरम्यान, रेल्वे कर्मचाऱ्यांनी इतर दोन डबे सुरक्षित स्थळी आणले. विजय भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाच्या २० जवानांनी आग आटोक्यात आणली आहे. Pune News
मिळालेल्या माहिती नुसार, घटनास्थळी पोहोचताच ठिकाणी क्वीन्स गार्डनच्या पाठीमागील बाजूकडे (कॉम्प्रेसर रुमनजीक) क्रमांक चार रेल्वे मार्ग येथे बऱ्याच दिवसापासून उभ्या स्थितीत असलेल्या रेल्वेच्या तीन डब्ब्यापैंकी मधल्या एका डब्ब्याला आग लागल्याचे निदर्शनास आलं. तेथील विद्युत विभागाशी संपर्क साधून विद्युत प्रवाह बंद करण्याच्या सूचना देत जवानांनी लगेच पाण्याचा मारा सुरू केला.
आतमध्ये कोणी प्रवासी अथवा रेल्वे कर्मचारी नसल्याची खात्री केली आणि सुमारे अर्धा तासात आगीवर नियंत्रण मिळवत पुढे कुलिंग ऑपरेशन सुरू ठेवलं. रेल्वे कर्मचारी यांच्या मदतीने इतर दोन डबे सुरक्षित ठिकाणी नेत धोका दूर केला. त्यानंतर आगीवर सतत पाण्याचा मारा सुरू ठेवत आग पुर्ण विझवली.