पुणे ( हवेली ) बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांचा अखेर राजीनामा; वर्षभराच्या राजकीय घडामोडीनंतर संचालक मंडळात मनोमिलन…


पुणे : कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांनी मुदत संपल्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आज सोमवार ७ जुलै रोजी त्यांनी हा राजीनामा जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था, पुणे ग्रामीण) प्रकाश जगताप यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदीप कंद, माजी सभापती प्रकाश जगताप, संचालक रोहिदास उंद्रे, राजाराम कांचन, प्रशांत काळभोर, रामकृष्ण सातव, सुदर्शन चौधरी यांच्यासह इतर बाजार समितीचे संचालक उपस्थित होते.

दरम्यान दिलीप काळभोर यांची नऊ मे २०२३ रोजी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती. यापूर्वीही काळभोर यांनी बाजार समितीचे सभापतीपद भूषवले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीने उत्पन्नवाढ आणि विकासकामे यशस्वीपणे पूर्ण केली.

दिलीप काळभोर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “माझ्या सभापती पदाच्या कार्यकाळात संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ तसेच विकासकामांना गती मिळाली. भविष्यातही मी बाजार समितीच्या विकासासाठी योगदान देत राहणार आहे.”

दरम्यान दिलीप काळभोर यांच्या कार्यपद्धतीवरून संचालक मंडळात मतभेद निर्माण झाले होते. ४ जुन २०२४ रोजी दहा संचालकांनी सभापती दिलीप काळभोर बाजार समितीच्या कामकाजाबाबत विश्वासात घेत नसल्याबाबत सचिवांना पत्र दिले होते. त्यानंतर सचिवांनी याबाबत बैठक आयोजित केली होती. त्याविरोधात सभापती कळभोर यांनी पणन संचालकाकडे अपील केले होते. पणन संचालकांनी सुरूवातीला बैठकीला स्थगिती दिली. त्यानंतर बैठकीबाबत आठ दिवसात निर्णय घेण्याचे आदेश सचिवांना दिले होते. या निर्णयाच्या विरोधात सभापती काळभोर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, या आदेशात हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. त्यानंतर ही बैठक पार पडली आणि त्यामध्ये काळभोर यांच्या स्वाक्षरीचे अधिकार काढण्याचा ठराव मंजूर झाला होता.

आता काळभोर यांनी राजीना दिल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदासाठी नवीन हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. ही बाजार समिती आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बाजार समिती म्ह्णून ओळखली जाते. सभापतीपदाची निवडणूक ही नेहमीच पुणे जिल्ह्याच्या राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जाते.

२०२३ मध्ये झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीने १८ पैकी १३ जागा जिंकत वर्चस्व प्रस्थापित केले होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलला केवळ २ जागांवर यश मिळाले होते. दिलीप काळभोर यांच्या राजीनाम्यानंतर सभापतीपदासाठी इच्छुकांमध्ये चुरस वाढणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!