Pune Crime : मुलीचे अश्लील व्हिडीओ बनवून केले व्हायरल, पुण्यातील तरुणाला मुंबईतून पोलिसांनी ठोकल्या बेड्या..
Pune Crime : मुलीला वारंवार मेसेज पाठवून, व्हिडीओ कॉल करुन तिचे अश्लील व्हिडीओ बनवणाऱ्या पुण्यातील तरुणाला रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने त्याचा शोध घेऊन मुंबईतील चेंबूर येथील देवनार परिसरातून त्याला अटक केली.
दशरथ सिद्धराम गायकवाड उर्फ वनराज आश्विन देशमुख (वय. ३२, रा. संतोष नगर, पाण्याचे टाकीजवळ, शनिमंदिर समोर, पुणे) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. त्यानुसार रविवारी (ता.७) गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सविस्तर माहिती अशी की, दशरथ गायकवाड हा मुलीला सोशल मीडियावर त्याच्या वेगवेगळ्या अकाउंटवरुन चॅटींग करत होता. तसेच मुलीला वारंवार व्हिडीओ कॉल करुन तिचे अश्लील फोटो काढले. मुलीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करुन, तसेच अनेकांना पाठवून मुलीची बदनामी करत होत. त्याने मुलीला, तिचे वडील व भावाला शिवीगाळही केली होती. याबाबत गायकवाड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. Pune Crime
गुन्हा दाखल झाल्यानंतर दशरथ गायकवाड फरार झाला होता. पोलीस त्याच्या मागावर होते. मात्र, तो पोलिसांना हुलकावणी देत होता. त्याचा शोध घेत असताना तो मुंबईतील चेंबूर येथील देवनार परिसरात असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने चेंबूर येथे त्याचा शोध घेऊन अटक केली.
दरम्यान, त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला. मोबाईलची तापसणी केली असता आरोपीने इतर अनेक मुलींशीही सोशल मीडियावर चॅटिंग केल्याचे दिसून आले. तसेच त्या मुलींना व्हिडीओ कॉल करुन त्यांचे अश्लील फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.