Pune Crime : १२ वर्षीय मुलीने केली आत्महत्या, वडिलांनी तपास केल्यावर भयंकर माहिती आली समोर…

Pune Crime : एक धक्कादायक प्रकार पुण्यातील पिंपरी चिंचवडमधून समोर आला आहे. या वर्षी ६ जून रोजी पिंपरी चिंचवडमध्ये१२ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पण या धक्क्यातून सावरल्यानंतर तिच्या वडिलांनी याबद्दल तपास केला आणि यामधून धक्कादायक माहिती समोर आली.
सविस्तर माहिती अशी की, ६ जून रोजी पिंपरी चिंचवडमधील १२ वर्षीय मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. आपल्या पोटच्या मुलीने उचलेल्या या पावलामुळे तिचे वडील अस्वस्थ झाले होते. पण तिने हे टोकाचे पाऊल का उचलेले? याचा शोध लावण्याचा निर्णय तिच्या वडिलांनी घेतला होता. तिने आत्महत्या का केली? याचे कारण शोधण्यासाठी त्यांनी तिचे कपडे, तिच्या सगळ्या वस्तू तपासण्यास सुरुवात केली.
तेंव्हा मुलीच्या एका कपड्यामध्ये एका खिशात चिट्टी सापडली. त्यामध्ये त्यांना एक मोबाईल नंबर सापडला. विशेष म्हणजे कुटुंबातील कोणाचाच हा नंबर नव्हता. त्यामुळे मुलीच्या वडिलांना याबद्दल शंका आली. त्यांनतर त्यांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासले असता त्यामध्ये २ मुले सातत्याने तिच्या आजूबाजूला असल्याचे दिसून आले.
याप्रकरणी आत्महत्या केलेल्या मुलीच्या वडिलांनी भोसरी पोलीस ठाणे गाठले. क्षितिज पराड आणि तेजस पठारे या दोन जणांनी माझ्या मुलीचा पाठलाग केला. त्यानंतर तिचा लैंगिक छळ केला. त्यानंतरच त्यांच्या त्रासाला कंटाळून मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली, असा आरोप तिच्या वडिलांनी केला. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात पॉक्सोचा गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. Pune Crime
दरम्यान, आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीचे वडील हे चहा विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांची चहाची टपरी असून यातूनच त्यांच्या उदरनिर्वाह चालतो. पण आपल्या मुलीने असे टोकाचे पाऊल का उचलले? तिने कधीच कोणाशी तिला होणाऱ्या त्रासाबद्दल का सांगितले नाही? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा निर्धार तिच्या वडिलांनी केला. त्यानंतर हे विदारक चित्र त्यांच्यासमोर आले. याप्रकरणी तिचा लैंगिक छळ झाल्याचा आरोप करत भोसरी पोलीस ठाण्यात ५ ऑक्टोबर रोजी फिर्याद दिली.
संबधित मुलीच्या वडिलांनी केलेल्या आरोपाची दखल घेत भोसरी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून घेतला. तसेच, क्षितिज पराड आणि तेजस पठारे या दोघांना अटक केली. पण एकंदरच पोलिसांच्या भूमिकेवरही पुन्हा एकदा सवाल करण्यात आले आहे.
वडिलांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. पण त्यांनी इतके महिने कारवाई का केली नाही? मुलीने आत्महत्या केली, यामागचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी का प्रयत्न केले नाहीत? असे अनेक सवाल आता नागरिकांकडून केले जात आहेत.