Pune Crime : नशेत बायकोविषयी अश्लील बोलला अन् जीवलग मित्राने दोस्ताचा काटा काढला, पुण्यात खळबळजनक घटना

Pune Crime पुणे : मित्रासोबत दारु पिताना त्याच्या पत्नीविषयी अश्लील शब्द बोलल्याने पुलावरून ढकलून देत हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आली आहे. तब्बल सहा महिन्यांनी या हत्याकांडाला वाचा फुटली आहे. वाकड पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. (Pune Crime)

सिद्धांत रतन पाचपिंडे (वय. २३, रा. गुरुनानक नगर कॉलनी, रहाटणी), प्रतीक रमेश सरवदे (वय. २५, रा. कुदळवाडी, चिखली) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, दिनेश दशरथ कांबळे (वय. २६) असे खून झालेल्याचे नाव आहे. तरुण बेपत्ता झाल्याप्रकरणी कुटुंबीयांनी सहा महिन्यांनी तक्रार केली होती.
मिळालेल्या माहिती नुसार, दिनेश कांबळे सहा महिन्यांपासून बेपत्ता असल्याची तक्रार वाकड पोलिस ठाण्यात दिली होती. त्यावरून पोलिसांनी दिनेशच्या मित्रांकडे चौकशी केली. दिनेश १५ मार्च २०२३ रोजी रात्री काळेवाडी फाटा येथे मित्र सिद्धांत पाचपिंडे आणि प्रतीक सरवदे यांच्यासोबत दारू प्यायला बसला होता.

त्यावेळी त्यांच्यात भांडण झाले, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सिद्धांत आणि प्रतीक यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

सिद्धांत, प्रतीक आणि दिनेश हे तिघे १५ मार्चला दारू प्यायला बसले. त्या वेळी दिनेश याने प्रतीकच्या पत्नीबाबत अश्लील भाषा वापरली. त्यातून त्यांची भांडणे झाली. प्रतीक आणि सिद्धांत यांनी दिनेशच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून त्याला जखमी केले.
त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्याचे ठरवले. मात्र, पोलिस चौकशी होईल, या भीतीने रुग्णालयाच्या ऐवजी ते कासारवाडीला गेले. नाशिक फाटा उड्डाणपुलावरून त्यांनी दिनेशला महामार्गावर फेकून दिले.
दरम्यान, जुन्या पुणे मुंबई रोडवर मयत अवस्थेत आढळून आल्यानंतर बेवारस व्यक्तीचा अपघाताची केस भोसरी पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. त्यानंतर भोसरी पोलिसांनी तपास करत लपवण्यात आलेल्या खून प्रकरणाचा उलघडा केला आहे.