सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपचा ‘पडद्याआडून’ डाव? रोहित पवारांचा मोठा दावा; अजितदादांच्या गैरहजेरीचाही उल्लेख


बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी बारामतीतील राजकीय समीकरणं अधिकच गुंतागुंतीची होताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट कारखान्यावरील वर्चस्वासाठी आमनेसामने असतानाच, या निवडणुकीच्या माध्यमातून भाजप बारामतीत शिरकाव करण्याच्या प्रयत्नात असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यामुळे सोमेश्वर कारखान्याची निवडणूक आता केवळ सहकारी संस्थेची निवडणूक न राहता प्रतिष्ठेची राजकीय लढाई बनली आहे.

सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोमेश्वर कारखान्याची सत्ता कायम राखण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही निवडणुकीत ताकद लावली असून, प्रचाराची धुरा युगेंद्र पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे पवार कुटुंबातील राजकीय संघर्षाची झलक सोमेश्वरच्या निवडणुकीतही पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, आंदोलनस्थळी पत्रकारांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी या निवडणुकीबाबत थेट भाजपवर निशाणा साधला. “अजितदादा असते तर श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पुरुषोत्तम जगताप हे वेगळे झाले नसते. भाजप बारामतीमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करतंय,” असा दावा त्यांनी केला. त्यामुळे पुरुषोत्तम जगताप यांच्या भूमिकेभोवतीही राजकीय चर्चा रंगली आहे.

रोहित पवार यांनी शरद पवारांच्या पुढील भूमिकेचेही संकेत दिले. येत्या काळात सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत शेतकऱ्यांच्या हितासाठी शरद पवार काही राजकीय समीकरणं जुळवतील, असं त्यांनी सांगितलं. सध्या आपण एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठी लढत असल्याचं सांगताना, आंदोलन संपल्यानंतर दुष्काळ दौऱ्यावर जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या दौऱ्यातून वेळ मिळाला तर सोमेश्वर कारखान्याच्या प्रचारासाठी जाणार असल्याचं रोहित पवारांनी सांगितलं.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चेच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. मुख्यमंत्री हुशार व्यक्ती असून आपले त्यांच्याशी मतभेद आहेत; मात्र विद्यार्थ्यांच्या हितासाठी चर्चेला तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला बोलावलं तर आपण जाणार नसल्याचं, मात्र विद्यार्थी चर्चेसाठी जातील, अशी भूमिका रोहित पवारांनी मांडली. दुष्काळामुळे शेतकरी पूर्णपणे आर्थिक अडचणीत सापडल्याचंही त्यांनी नमूद केलं.

दरम्यान, अजित पवारांच्या अपघात प्रकरणावरून रोहित पवारांनी केलेल्या विधानामुळेही राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. येत्या १० ऑक्टोबरला आपण सर्व सादरीकरण घेऊन येणार असून, पुराव्यांसह संबंधित नेत्याचं नाव जाहीर करणार असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच व्हीएसआर कंपनीला कोण वाचवत आहे, याचाही खुलासा करणार असल्याचं ते म्हणाले. यापूर्वी त्यांनी ज्या नेत्याला ‘मफलर मॅन’ अशी उपाधी दिली होती, तो नेता कोण, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

एकीकडे राष्ट्रवादीचे दोन्ही गट सोमेश्वर कारखान्याच्या सत्तेसाठी आमनेसामने आले आहेत, तर दुसरीकडे भाजपच्या कथित शिरकावाचा आरोप झाल्याने या निवडणुकीला वेगळंच राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यामुळे आगामी काळात शरद पवार कोणतं समीकरण जुळवतात, सुनेत्रा पवार गटाची रणनीती काय असते आणि रोहित पवारांच्या दाव्यांचा निवडणुकीवर किती परिणाम होतो, याकडे बारामतीसह संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!