Pune Crime : चाकण येथे गुंडांचा धुमाकूळ, दुकानदारांना दिली धमकी, हप्ते द्या नाही तर…
Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.
चाकण मधील कपडे दुकान, सलून दुकानदारांना मारहाण करुन त्यांना हप्ते द्या, नाही तर दुकाने फोडून टाकेन, अशी धमकी गुंडाने दुकानदारांना दिली आहे. हा प्रकार महात्मा फुले चौकात गुरुवारी दुपारी अडीच वाजता घडला आहे.
याप्रकरणी सुनिल नारायण गेहलोत (वय ३६, रा. चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी किरण कचर पवळे (वय२३, रा. महात्मा फुले चौक, चाकण) याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. Pune Crime
सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी यांचे कापड दुकान आहे. किरण पवळे हा दुकानात आला व टी शर्ट दाखवायला सांगितले. ते टी शर्ट दाखवत असताना त्याने फिर्यादींना अश्लिल शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तू मला ओळखतो का? तुझे सगळे दुकान फोडून टाकेन. उद्यापासून मला हप्त्याचे पैसे चालू करायचे नाही तर तुला सोडणार नाही़ असे म्हणून फिर्यादींच्या तोंडावर बुक्क्या मारल्या.
त्यांच्या कामगारालाही तुलाही मारुन टाकेन, अशी धमकी दिली. फिर्यादी हे तक्रार देण्यास पोलीस चौकीत जात असताना वाटेत त्याने ब्लॅक झोन हेअर अँड स्पा या सलून दुकानाचे मालक प्रकाश श्रीवास्तव यांनाही त्याने हप्त्यासाठी धमकाविले असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक बुरुड तपास करीत आहेत.