Pune Crime : सराफावर गोळीबार प्रकरण! वानवडी पोलिसांनी चोरट्यांना दिल्लीतून ठोकल्या बेड्या..
Pune Crime : पुण्यामधील वानवडी भागातील बीटी कवडी रोड जवळ दुकान बंद करून घरी जाणाऱ्या सराफावर भर रस्त्यात गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. Pune Crime
ही घटना घोरपडी परिसरातील बी.टी. कवडे रस्त्यावर बुधवारी (ता. ८) रोजी रात्री घडली होती. या गुन्ह्यातील तीन आरोपींना वानवडी पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. आतापर्यंत गुन्ह्यामध्ये सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अहमद असदली त्यागी (वय.३४ रा. सिलमपुर, उत्तर पूर्व दिल्ली मुळ रा. हंडीया मोहल्ला, मुजफ्फरनगर, उत्तरप्रदेश), हनी जीते वाल्मिकी (वय. २६ रा. आंबेडकर वस्ती, साऊथ वेस्ट दिल्ली) आणि सागर राज कुमार (वय. २६ रा. वाल्मीकी मुहल्ला, नॉर्थ वेस्ट दिल्ली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर सर्फराज शेख (वय.२३ ), लखन अंकोशी (वय. ३५ दोघे रा. रामटेकडी, हडपसर), रफीक शब्बीर शेख (वय.३० रा. घोरपडी) यांना यापूर्वीच अटक केली आहे.
या घटनेत साराफी व्यावसायिक प्रतीक मदनलाल ओसवाल (वय-30 रा. मुंढवा) हे गंभीर जखमी झाले असून त्यांचे वडील मदनलाल ओसवाल यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
घटनेच्या दिवशी आरोपी सय्यदनगर परिसरातील ओसवाल यांच्या पेढजवळ गेले. ते पेढी बंद करुन दुचाकीवरुन जात असताना सर्फराज, रफीक, लखन आणि त्यांच्या साथीदारांनी ओसवाल यांना बी.टी. कवडे रोडवर आडवले. त्यांनी प्रतिक ओसवाल यांच्या हातातील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला असता, प्रतिक यांनी विरोध केला.
त्यावेळी आरोपीपैकी एकाने त्याच्याकडील गावठी पिस्टलने प्रतिक यांच्या दोन्ही पायावर व गालावर गोळी झाडून गंभीररित्या जखमी केले. त्यानंतर त्यांच्याकडील सोन्याची बॅग हिसकावुन पळून गेले. बॅगेमध्ये दोन तोळे सोन्याच दागिने व रोख दहा हजार रुपये होते.
गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना आरोपी दिल्ली येथे पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वानवडी पोलिसांचे एक पथक तातडीने दिल्ली येथे रवाना करण्यात आले. पथकाने तांत्रिक विश्लेषण व स्थानिक पोलिसांच्या मदतीने गुन्ह्यातील तीन आरोपींना शिताफीने पकडले. त्यांना न्यायालयात हजर केले असता २० नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.