पुणे बॉम्ब अपडेट: आधी दाढी काढली मग रुग्णालयात ठेवली बॉम्बसदृश वस्तू; गुन्ह्याच्या दिवशीच बदलला लूक, आरोपीच्या प्लॅनचे खळबळजनक खुलासे…

पुणे : हडपसर येथील रुग्णालयात बॉम्बसदृश वस्तू ठेवल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या शिवाजी राठोड याच्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांची दिशाभूल करून ओळख लपवण्यासाठी त्याने गुन्ह्याच्या दिवशीच आपला संपूर्ण ‘लुक’ बदलल्याचे तपासात उघड झाले आहे.

दाढी ठेवण्याची आवड असलेला शिवाजी राठोड बुधवारी (१३ मे) सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान मांजरी बुद्रुक येथील एका सलूनमध्ये गेला. रुग्णालयात बॉम्बसदृश वस्तू ठेवण्यापूर्वीच त्याने पूर्ण दाढी आणि मिशा काढून टाकल्या.
“माझ्याकडे आता पैसे नाहीत, नंतर देतो… मला दवाखान्यात जायचे आहे,” असे सांगत तो सलूनमधून निघून गेला. नेहमी दाढीमध्ये दिसणाऱ्या शिवाजीचा अचानक बदललेला लुक पाहून त्याच्या ओळखीतील लोकांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता.

शिवाजी राठोड गेल्या तीन महिन्यांपासून मांजरीतील धावटे वस्ती परिसरात ‘द रिअल कलेक्शन’ नावाचे दुकान चालवत होता. चष्मे, पट्टे आणि कपड्यांचा व्यवसाय करणाऱ्या शिवाजीवर आर्थिक संकट ओढावले होते. गेल्या तीन महिन्यांपासून दुकानाचे भाडे थकल्याने दुकानमालकाने चार दिवसांपूर्वीच दुकानाला कुलूप ठोकले होते. याच दुकानातील व्यवहार आणि ऑनलाइन लिंकच्या आधारे पोलिसांना तपासात महत्त्वाचे धागेदोरे मिळाले.

पुणे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवताच शिवाजी शहराबाहेर पळाल्याचे स्पष्ट झाले. अखेर दहशतवादविरोधी पथकाच्या (ATS) मदतीने त्याला नागपूर रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेण्यात आले. दाढी-मिशा काढून लुक बदलत पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा त्याचा प्रयत्न तांत्रिक तपासामुळे फसला.
तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोपीला रुग्णालयातून उपचारासाठी तब्बल सात लाख रुपयांचा खर्च सांगण्यात आला होता. मात्र, एवढी रक्कम नसल्याने डॉक्टरांकडून पैसे उकळण्यासाठी त्याने रुग्णालयात बॉम्बसदृश वस्तू ठेवून खंडणी मागण्याचा कट रचल्याचे समोर आले आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे पुणे शहरातील पोलिस यंत्रणा अक्षरशः सतर्क झाली होती. आरोपीच्या या उठाठेवीमुळे पोलिस दलाची मोठी धावपळ उडाली होती.