तांबेंना ताब्यात घेताच आंदोलकांचा संताप अनावर! पोलिसांची गाडी अडवली, हात धरून बाहेर खेचण्याचा प्रयत्न; पुणे-नाशिक रेल्वेसाठी महामार्गावर मोठा राडा

नाशिक : पुणे-नाशिक थेट रेल्वे प्रकल्पाच्या मार्गावरून सुरू असलेला वाद आता थेट रस्त्यावर आला आहे. प्रकल्पाचा मूळ मार्ग खेड-मंचर-नारायणगाव या भागातूनच असावा, या मागणीसाठी रविवारी नाशिक-पुणे महामार्गावर विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात आमदार सत्यजित तांबे सहभागी झाले होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलक अधिकच आक्रमक झाले आणि पोलिसांचं वाहनच अडवलं.
नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात सकाळी ९ वाजल्यापासून चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झाली. सिन्नर, संगमनेर, चाकण, मंचर, नारायणगाव आणि आळेफाटा परिसरात नागरिक रस्त्यावर उतरले. पुणे-नाशिक रेल्वेच्या मूळ मार्गात बदल केल्याने अहिल्यानगरकरांनी विरोध दर्शवला आहे. रेल्वेचा मार्ग खेड, मंचर आणि नारायणगावमधूनच झाला पाहिजे, अशी आंदोलकांची ठाम मागणी आहे.

आंदोलनादरम्यान सत्यजित तांबे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांना पोलिसांच्या गाडीतून घेऊन जात असताना आंदोलकांनी वाहनाचा मार्ग रोखला. काही जण गाडीसमोर उभे राहिले, तर काहींनी तांबे यांना गाडीत नेता येऊ नये म्हणून त्यांचा हात धरून त्यांना बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत पोलिसांच्या वाहनाला पुढे जाण्यापासून रोखलं.


पुणे-नाशिक रेल्वे हा केवळ वाहतुकीचा प्रकल्प नसून नाशिकच्या विकासाचा आणि भविष्यातील आर्थिक प्रगतीचा प्रश्न आहे, अशी भूमिका सत्यजित तांबे यांनी मांडली आहे. सरकारला नागरिकांच्या मनातील भावना समजून घ्यायच्या असतील, तर रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल, असंही त्यांनी म्हटलं होतं.
या आंदोलनाचा थेट परिणाम नाशिक-पुणे महामार्गावरील वाहतुकीवर झाला. अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सिन्नर, संगमनेर आणि चाकणमध्ये एकाचवेळी आंदोलन झाल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली. त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या मार्गातील बदलाला विरोध आणि मूळ मार्ग कायम ठेवण्याच्या मागणीवरून आंदोलनाची तीव्रता वाढत चालली आहे. सत्यजित तांबे यांच्या ताब्यानंतर घडलेल्या या प्रकारामुळे आता हा मुद्दा आणखी चर्चेत आला असून, केंद्र सरकार या रेल्वे मार्गाबाबत पुढे कोणती भूमिका घेणार, याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे.