मान्सूनपुर्व कामांचे नियोजन करुन कामे वेळेत पुर्ण करावीत – अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड


पुणे : मान्सूनपूर्व कामांचे नियोजन करुन सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, अशा सूचना अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांनी दिल्या. पुणे विभागाची मान्सून पूर्व आढावा बैठक विधानभवन येथे अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

यावेळी पुणे शहर विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त ए. राजा, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजकुमार मगर, विभागीय आयुक्तालयाचे उपायुक्त रामचंद्र शिंदे, पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता हणुमंत गुणाले, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ आदींसह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. दूरदृष्य प्रणालीद्वारे सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली जिल्हा प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.

कुसगाव येथील तरुणाचा अपहरण करून खून करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

डॉ. रामोड म्हणाले, सर्व जिल्ह्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा अद्ययावत ठेवावा. महापालिकांनी नालेसफाई पावसाळ्यापूर्वी पूर्ण करुन घ्यावी. पावसाचे पाणी तुंबणाऱ्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. धोकादायक इमारतींच्या अनुषंगाने संबंधितांना नोटीसा देऊन रहिवाशांचे स्थलांतर करावे. आवश्यक तेथे अशा इमारती निष्कासीत करण्याची कार्यवाही करावी. नदीपात्रातील अतिक्रमणे काढावीत.

महावितरणने पावसाच्या काळात वीजपुरवठा विस्कळीत होणार नाही यासाठी दक्षता घ्यावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांचे खड्डे भरण्याचे काम वेळेत पूर्ण करुन घ्यावे. धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे. अशा पुलांवरुन वाहतूक होणार नाही याकडे लक्ष द्यावे.

डॉ. रामोड पुढे म्हणाले, आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत सर्व जिल्ह्यांना वितरीत केलेल्या बोटी तसेच इतर साहित्य सुसज्ज ठेवावे. आपत्तीप्रसंगी उपयोगात येऊ शकणाऱ्या जेसीबी, पोक्लेन आदी यंत्रसामग्रीची यादी अद्ययावत ठेवावी. संभाव्य दरडप्रवण गावे तसेच भूस्खलनप्रवण गावांत संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात. पूरप्रवण गावातील नागरिकांना आपत्तीच्या काळात आवश्यकता पडल्यास स्थलांतरीत करण्यासाठी पर्यायी निवारा निश्चित करावा.

वंदेमातरम न म्हटल्याने MIM नगरसेवकांना मारहाण, घटनेमुळे वातावरण तापले

पावसामुळे संपर्क तुटणारी गावे, दुर्गम भागातील गावांना आवश्यकता असल्यास सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे अन्नधान्य आगाऊ देण्याची व्यवस्था करावी. पुरेसा राखीव धान्यसाठा ठेवावा. लोणावळा, भोर, सातारा जिल्ह्यातील कास, ठोसेघर, वेण्णा तलाव आदी पावसाळी पर्यटनस्थळी पर्यटकांची गर्दी होऊन दुर्घटना होऊ नयेत यासाठी पोलीस विभागाने काळजी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात 2019 मध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे गंभीर स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग आदीच्या अनुषंगाने पाटबंधारे विभागाने कर्नाटकसोबत योग्य पद्धतीने आंतरराज्य समन्वय ठेवावा.पूरपरिस्थितीत जनावरांना स्थलांतरीत करावे लागू शकते. त्यासाठी निवाऱ्याची जागा, चाऱ्याच्या व्यवस्थेचे नियोजन करावे. पशुसंवर्धन विभागाने पशुधनाचे लम्पी प्रतिबंधक लसीकरण तसेच जनावरांचे अन्य पावसाळी आजारांचे लसीकरण मान्सूनपूर्वी करुन घ्यावे, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

सर्व विभागांनी आपले आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित करावेत. पाटबंधारे विभागाने धरणांवर अनुभवी मनुष्यबळाची नेमणूक करावी. पाणी सोडण्याबाबत पूर्वसूचना पुरेशा आधी देण्याची व्यवस्था करावी. जिल्हा परिषदेने शाळा, अंगणवाड्यांच्या इमारतींची दुरुस्ती करुन घ्यावी. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पुरेसा ओषधसाठा ठेवावा. आरोग्य पथके सुसज्ज ठेवावीत. नदीवरील पाणीपुरवठा योजना सुरळीत राहतील याची दक्षता घ्यावी. कृषि विभागाने पुरेसा बियाणेसाठा उपलब्ध ठेवावा, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

फेसबुकवरील मैत्री भोवली, विधवा महिलेवर अत्याचार करून घातला ३० लाखांला गंडा

दूरदृष्य प्रणालीद्वारे सातारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, कोल्हापूर जिल्हाधिकारी राहूल रेखावार, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, सांगली जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, सोलापूर जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी संबंधित जिल्ह्यांचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा, नदीकाठच्या गावांची यादी, खबरदारीसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचे नियोजन, नागरिकांसाठी लाईफ जॅकेटचे किट, आवश्यक साहित्यांची व बोटींची व्यवस्था आदी बाबींची माहिती दिली.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!