पुण्यात राजकीय भूकंप! विधानपरिषद उमेदवारीवरून महायुतीतच ‘नाराजी नाट्य’, जय पवारांच्या वक्तव्यानं वाढली चर्चा

पुणे : पुण्यात विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून उमेदवारीवरून महायुतीत अंतर्गत संघर्षाचे चित्र समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विक्रम काकडे यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले असले तरी पक्षातीलच काही नेत्यांनी डमी आणि अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महायुतीच्या जागावाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली असून पक्षाने विक्रम काकडे यांना अधिकृत उमेदवार म्हणून पुढे केले आहे. मात्र सुनील टिंगरे यांच्यासह काही नेत्यांनी अर्ज दाखल केल्याने या निवडणुकीला वेगळे वळण मिळाले आहे. टिंगरे यांचा अर्ज डमी स्वरूपात असून वैधता निश्चित झाल्यानंतर तो मागे घेण्यात येईल, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, भाजपचे प्रदीप कंद यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून स्पर्धा अधिक तीव्र केली आहे. त्यामुळे महायुतीसमोर बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. तर शरद पवार गटाकडून श्रीकांत पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणूक अधिक चुरशीची बनली आहे.

या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना जय पवार यांनी स्पष्ट केले की, “महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतलेला आहे आणि आम्ही तो मान्य केला आहे. काही नाराजी असली तरी संवादातून ती दूर केली जाईल. कोणतीही नाराजी असेल तर आम्ही सर्वांशी भेटून ती दूर करू. ही निवडणूक बिनविरोध व्हावी हीच आमची इच्छा आहे,” असे जय पवार यांनी म्हटले.

तर माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विक्रम काकडे हेच अधिकृत उमेदवार असल्याचे सांगत सर्व निर्णय सामूहिक चर्चेतून घेतल्याचे स्पष्ट केले. महायुती एकत्र असून निवडणूक जिंकण्यावर भर असल्याचे त्यांनी नमूद केले.
भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांनीही महायुतीचा निर्णय अंतिम असल्याचे सांगत उमेदवाराला पूर्ण पाठिंबा दिला जाईल असे स्पष्ट केले. दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 4 जूनपर्यंत असल्याने पुढील काही दिवस पुण्यातील राजकीय घडामोडींना अधिक वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.