पुण्यातील फ्रेशर्स पार्टीप्रकरणी पोलीस आयुक्तांनी उचललं मोठं पाऊल, कारवाई होणार?

पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वी मुंढव्यातील पिंगळे वस्ती परिसरातील एका पबमध्ये फ्रेशर पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीसाठी पोलिस व उत्पादन शुल्क विभागाची परवानगी घेतलेली नव्हती. या पार्टीत अल्पवयीन मुलांना मद्य विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. आता याप्रकरणी पोलीस आयुक्तांनी मोठे पाऊल उचललं आहे. या फ्रेशर्स पार्टीत अल्पवयीनांना मद्यविक्री केल्यास किंवा अन्य गैरप्रकार झाल्यास संबंधित इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी, पब आणि हॉटेलचा परवाना रद्द केला जाईल, असा इशारा पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिला आहे.

पुण्यातील फ्रेशर्स पार्टीच्या घटनेची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, ‘शहरातील काही बार, पबमध्ये नियमांचे उल्लंघन करून अल्पवयीनांना मद्य विक्री केली जात आहे. नियम मोडणाऱ्या आयोजक व इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाईल. असा कडक इशारा त्यांनी दिला आहे. तसेच पार्टीत अल्पवयीनांना मद्य विकल्याचे आढळल्यास आयोजक वपबचालकांविरुद्ध थेट गुन्हा दाखल केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. याआधी मुंढव्यात पार्टीतील तरुणांनी रस्त्यात मद्याच्या बाटल्या फोडल्याने रहिवाशांनी पोलिसात धाव घेतली होती.
या प्रकरणी रहिवाशांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानंतर २३ ऑगस्टला मध्यरात्री राजा बहाद्दूर मिल परिसरातील किकी हॉटेलमध्ये मोठी फ्रेशर पार्टी आयोजित करण्यात आली. या पार्टीत १०० ते १५० महाविद्यालयीन तरुण-तरुणी सहभागी झाले होते. विद्यार्थी अल्पवयीन असूनही त्यांना मद्य विक्री केल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला होता. त्यानंतर आता पुणे पोलीस आयुक्त ॲक्शन मोडवर आले आहेत.
