यवत येथे मशिदींची तोडफोड, जाळपोळ करणाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू; अनेक जणांना घेतले ताब्यात…

यवत : पुणे जिल्ह्यातील यवत गावात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी (ता.१ ऑगस्ट) सकाळी यवतमधील एका मुस्लिम युवकाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर गावात प्रचंड संतापाची लाट उसळली.

त्याचे पर्यवसान हिंसेत झाले असून वाहने पेटविणे, घराला आग लावणे तसेच मशिदीची प्रचंड प्रमाणात मोडतोड करण्यात आली आहे. यानंतर युवकांनी त्यांचा मोर्चा सहकारनगर, इंदिरानगर, स्टेशन रस्ता येथील मशिदीवर नेला.
दरम्यान, त्या ठिकाणी त्या मशिदीची तोडफोड व जाळपोळ करण्यात आली. यानंतर पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणली, तसेच तणावपूर्ण परिस्थितीमुळे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जमावबंदी आदेश लागू केला.

यवत पोलिसांनी या घटनेतील संशयितांची शुक्रवारी रात्री धरपकड सुरू केली आहे. रात्रीत अनेकजण ताब्यात घेतले असल्याची खात्रीलायक माहिती मिळत असून अनेकजण फरार आल्याची माहिती मिळत आहे. जिल्हाधिकारी यांच्या जमाबबंदी आदेशमुळे यवतची बाजारपेठ शनिवारी देखील बंद पाहायला मिळाली.
यवतमधील एका तरुणाने एका पुजाऱ्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह मजकूर असलेले स्टेटस आपल्या व्हॉट्सॲपवर ठेवले होते. ही पोस्ट मध्य प्रदेशातील एका घटनेशी संबंधित असली तरी, स्थानिक पातळीवर त्यातून मोठा गैरसमज निर्माण झाला आणि अफवा पसरली.
दरम्यान, यानंतर दोन्ही समाजातील नागरिक एकत्र जमले, ज्यामुळे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही लोकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याने जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.