PMPML चा प्रवास होणार आणखी सुरक्षित, पुणे मनपाने घेतला मोठा निर्णय…

पुणे : मुंबई-पुणे मार्गावर ई-शिवनेरी बसमध्ये चालक आयपीएल सामना पाहत असतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याचं निलंबन करण्यात आलं होतं. त्यानंतर आता पुणे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.
पुण्यातील प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत PMPML प्रशासनाने कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. . बस चालवताना चालकाने नियम मोडल्यास त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे. प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेता पुणे प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
नवीन नियमानुसार, बस चालवताना मोबाइल फोनचा वापर, हेडफोन लावणे, तंबाखू किंवा पानमसाला खाणे यांसारखी कृत्ये केल्यास संबंधित चालक किंवा वाहकाला दोन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येणार आहे. या नव्या सूचनांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
जर कुणी PMPML चा कर्मचारी प्रवासादरम्यान नियम तोडताना दिसला, तर प्रवासी व्हॉट्सॲप नंबर 9881495589 वर तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करताना फोटो, व्हिडिओ किंवा इतर कोणताही पुरावा जोडल्यास त्वरित कारवाई केली जाईल, असं प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
तसेच हा निर्णय प्रवाशांच्या सहभागातून व्यवस्थेतील शिस्त आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या निर्णयामुळे चालकांचे अनुशासन वाढून अपघातांच्या संभाव्य घटना टाळल्या जातील. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्या नागरिकांनीही या मोहिमेत सक्रीय सहभाग घेऊन सुरक्षित प्रवासासाठी सहकार्य करावे, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.