मोठी बातमी! लाखो उमेदवारांच्या भवितव्याशी खेळ? दौंड SRPF भरती परीक्षेत महाघोटाळा; भरतीप्रमुखावरच मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप..

फिजा शेख

दौंड : दौंडमधील पोलीस भरती प्रक्रियेत मोठा घोटाळा उघडकीस आला असून सशस्त्र पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. देशभरात चर्चेत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणानंतर आता राज्यातील पोलीस भरतीतही गैरप्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात भरती प्रमुखालाच मुख्य सूत्रधार मानण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
दौंड येथील राज्य राखीव पोलीस दल (SRPF) गट क्रमांक 5 येथे 2 मे 2026 रोजी सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, या परीक्षेतील तब्बल 85 प्रश्न एका खासगी प्रकाशन संस्थेच्या सराव प्रश्नसंचातून जसेच्या तसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. परीक्षेनंतर उमेदवारांनीच हा प्रकार उघड केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेत संपूर्ण परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता ही परीक्षा 24 मे 2026 रोजी पुन्हा घेतली जाणार आहे.

या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीत दौंड SRPF युनिटचे समादेशक तथा भरती प्रमुख तुषार पाटील यांचे नाव समोर आल्याची माहिती आहे. पेपरफुटीप्रकरणी त्यांनाच मुख्य सूत्रधार मानण्यात आले असून प्राथमिक अहवाल राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे पाठवण्यात आला आहे. भरती प्रक्रियेवर देखरेख करणारे अधिकारीच संशयाच्या भोवऱ्यात आल्याने उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

NEET प्रकरणानंतर आता पोलीस भरतीतही गैरव्यवहार समोर आल्याने स्पर्धा परीक्षांच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. दरम्यान, या संपूर्ण रॅकेटचा तपास CID कडे सोपवण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात येत आहे.