प्रसादाच्या नावाखाली भाविकांच्या आरोग्याशी खेळ! शिर्डीच्या पेढ्यांमागचं धक्कादायक वास्तव समोर

शिर्डी : साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक शिर्डीत येतात. येथे प्रसाद म्हणून मिळणाऱ्या पेढ्याला विशेष महत्त्व असून, शिर्डीचा पेढा हा अनेक वर्षांपासून भाविकांच्या श्रद्धेचा भाग राहिला आहे. मात्र आता याच पेढ्यांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

वाढती स्पर्धा, कमी खर्चात अधिक नफा मिळवण्याची मानसिकता आणि विक्री वाढवण्याच्या प्रयत्नांमुळे काही ठिकाणी पेढ्यांच्या दर्जावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. पारंपरिक पद्धतीने खवा आणि साखरेच्या योग्य प्रमाणात तयार होणाऱ्या पेढ्यांऐवजी काही विक्रेते अत्यल्प खवा वापरून पेढे तयार करत असल्याची चर्चा आहे.
याहून गंभीर बाब म्हणजे अनेक पेढ्यांच्या पॅकेटवर उत्पादनाची तारीख, वजन, किंमत, घटक पदार्थांची माहिती आणि अन्न सुरक्षा नियमांनुसार आवश्यक तपशील नमूद केलेले नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे भाविकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, अन्न व औषध प्रशासन विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाई सुरू केली आहे. प्रसाद म्हणून विकल्या जाणाऱ्या पेढ्यांच्या गुणवत्तेबाबत तक्रारी आल्यानंतर विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. विविध दुकाने आणि विक्रेत्यांकडून पेढ्यांचे नमुने संकलित करण्यात आले असून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत.

तपासणी अहवालानुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या कारवाईमुळे शिर्डीतील प्रसाद विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.