माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा! उच्च न्यायालयाने दिले महत्वाचे आदेश..

बारामती : येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्यामुळे माळेगांव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लांबली होती. आता उच्च न्यायालयात दाखल झालेली याचिका निकाली काढण्यात आलेली आहे. त्यामुळे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
लवकर निवडणूक घेण्याची मागणी असा आदेश प्रादेशिक सहसंचालक साखर पुणे विभाग यांनी निवडणूक अधिकारी तथा प्रांतअधिकारी वैभव नावडकर यांना पत्राद्वारे केली आहे. यामुळे येणाऱ्या काळात बारामतीत पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापणार आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची सत्ता राखण्यासाठी सध्या अजित पवार प्रयत्नशील आहेत.
काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाने माळेगाव कारखान्यावर जागरण गोंधळ आंदोलन केलं होत. कारखान्याकडे विविध मागण्या केल्या होत्या. शरद पवार गट काय भूमिका घेणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. युगेंद्र पवार देखील निवडणुकीत लढण्याबाबत सकारात्मक आहेत. त्यांची भूमिका महत्वाची असणार आहे.
तसेच जेष्ठ नेते चंद्रराव तावरे व रंजन तावरे या जोडीची भूमिका देखील समोर आलेली नाही. आता निवडणूक जाहीर होणार असल्याने सर्वांनाच आपल्या भूमिका स्पष्ट कराव्या लागणार आहेत. त्या नेमक्या कधी स्पष्ट होणार याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांच्या गटाने गटनिहाय सभासद संपर्क दौरा केला आहे.
यामुळे निवडणुकीत रंगत वाढली आहे. तसेच एफआरपी प्रमाणे बाजारभाव दिल्याचे सांगून अप्रत्यक्षपणे प्रचारच सुरु केला आहे. यामुळे येणाऱ्या काळात माळेगावचे सभासद कोणाच्या पाठीमागे उभे राहणार हे लवकरच समजणार आहे. सध्या तरी कार्यक्षेत्रात याचीच जोरदार चर्चा सुरु आहे.