अबब! महिलेच्या पित्ताशयातून निघाले एक हजारांहून अधिक खडे, पुण्यात पार पडली शस्त्रक्रिया…

पुणे : अवघ्या २० मिनिटांत ३० वर्षीय महिलेच्या पित्ताशयातील एक हजारांहून अधिक खडे यशस्वीरीत्या काढण्यात पुण्यातील वैद्यकीय तज्ज्ञांना यश आले आहे. त्यामुळे महिला वेदनामुक्त झाली असून, तिच्या नवजात अर्भकाचे संगोपनही सहजतेने करता येत असल्याचेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
मिळालेल्या माहिती नुसार, गर्भावस्थेत ‘तिच्या‘ ओटीपोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. वैद्यकीय तपासणीतून तिच्या पित्ताशयात खडे असल्याचे निदान झाले. गर्भवास्थेमुळे हे खडे काढण्याची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. पण, प्रसूतीनंतर हा त्रास असह्य होऊ लागला. एक दिवशी अचानक वेदना वाढल्या. त्यामुळे तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले.
या बाबत माहिती देताना लँपरो ओबेसो सेंटरमधील बेरियाट्रिक आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. शशांक शहा म्हणाले, ‘रुग्णाला पित्ताशयातील खड्यामुळे पोटदुखीचा त्रास वाढला होता. तिच्या पित्ताशयावर ताण आल्याने अस्वस्थता वाढली होती. न
वजात अर्भकाला नियमित स्तन्यपान करणे आवश्यक होते. त्यासाठी ही शस्त्रक्रिया ‘डे केअर’ पद्धती करण्यास प्राधान्य दिले. ही शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी‘ म्हणून ओळखल्या शस्त्रक्रियेची निवड केली.‘
अशी केली शस्त्रक्रिया
शस्त्रक्रियेसाठी ओटीपोटावर घेतलेल्या छोट्या तीन छिद्रांमधून ‘लॅप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी‘ शस्त्रक्रिया केली. ही प्रक्रिया अवघ्या २० मिनिटांत पूर्ण झाली. त्यानंतर तिला वेदना झाल्या नाही आणि शस्त्रक्रियेनंतर २० तासांच्या आत घरी सोडण्यात आले. यामध्ये लहान १ ते २ मिलिमीटरचे हिरवट पिवळे हजारो खडे दिसून आले. रुग्ण बरा झाला आणि कोणत्याही वेदनेशिवाय तिची दैनंदिन कामे करत आहे.
कशामुळे होतात पित्ताशयात खडे?
‘रक्तातील कोलेस्टेरॉल, जास्त चरबीयुक्त आहार, आनुवंशिकता, लठ्ठपणा, मधुमेह, बैठी जीवनशैली, हार्मोनल बदल यांमुळे पित्ताशयात खडे तयार होण्याची शक्यता असते. पित्ताशयाचा तीव्र त्रास जाणवत असेल, तर वेळीच निदान आणि उपचार करणे गरजेचे आहे. पित्ताचे खडे कोलेस्टेरॉल, पित्त आणि क्षारांनी बनलेले असतात.
पित्त, क्षार हे यकृतामध्ये तयार होणारे पाचक घटक आहेत, जेव्हा ते शरीरातून बाहेर पडू शकत नाहीत तेव्हा ते कडक होतात आणि दगडांचे रूप धारण करतात. यावर उपचार न केल्यास आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असे डॉ. शशांक शहा यांनी सांगितले.