गॅस सिलिंडर ग्राहकांसाठी मोठी बातमी! बुकिंगमध्ये 2 नवे नियम लागू, लगेच वाचा काय बदललं…

नवी दिल्ली : देशातील इंधन आणि वायू पुरवठ्याबाबत केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. मध्य-पूर्वेत वाढत असलेल्या तणावामुळे आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर भारतातील इंधन व गॅस पुरवठा पूर्णपणे सुरक्षित आणि सुरळीत असल्याचे सरकारने सांगितले आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानेही देशातील पुरवठा साखळीवर सतत देखरेख ठेवली जात असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी काही नवीन डिजिटल व तांत्रिक उपाययोजना लागू करण्यात आल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या अधिकृत निवेदनानुसार देशात सध्या गॅस सिलिंडरचा कोणताही तुटवडा नाही. मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ९९ टक्के घरगुती सिलिंडरची नोंदणी आणि पुरवठा वेळेत पूर्ण केला जात आहे.

व्यावसायिक सिलिंडरच्या बाबतीतही सुमारे ७० टक्के मागणी पूर्ण केली जात असून, १४ मार्चपासून आतापर्यंत १८,२९,००० टन व्यावसायिक गॅसची विक्री झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

वायू पुरवठ्याची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सरकारकडून आवश्यक पावले उचलण्यात आली आहेत. १४ एप्रिल रोजी २०,४०० मेट्रिक टन एलपीजी घेऊन आलेला एक मोठा टँकर गुजरातमधील कांडला बंदरात सुरक्षितपणे दाखल झाला आहे.
अतिरिक्त सचिव मुकेश मंगल यांनी सांगितले की, या टँकरने ११ एप्रिल रोजी होर्मुझ सामुद्रधुनी यशस्वीरित्या पार केली होती, ज्यामुळे देशातील एलपीजी साठा पुरेसा आणि स्थिर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गॅस सिलिंडर बुकिंग आणि पुरवठ्यातील संभाव्य फसवणूक रोखण्यासाठी सरकारने ‘ओटीपी-आधारित बुकिंग’ प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या नियमानुसार ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठवला जाईल.
हा ओटीपी दिल्याशिवाय गॅस सिलिंडरची डिलिव्हरी पूर्ण केली जाणार नाही. या व्यवस्थेमुळे वितरण प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येईल आणि काळाबाजार रोखण्यास मदत होईल, असे सांगण्यात आले आहे.
तसेच स्थलांतरित मजूर आणि एकटे राहणारे कामगार यांच्या सोयीसाठी एजन्सींनी ५ किलोचे छोटे सिलिंडर उपलब्ध करून दिले आहेत. हे सिलिंडर खरेदी करण्यासाठी कोणत्याही पत्त्याच्या पुराव्याची गरज नसून, केवळ ओळखपत्र दाखवून ते मिळू शकतात.
३ एप्रिलपर्यंत अशा सुमारे ४०,००० मिनी सिलिंडरची विक्री झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय घरगुती पीएनजी जोडण्यांना प्रोत्साहन दिले जात असून, पीएनजी सेवा स्वीकारणाऱ्या ग्राहकांना त्यांचे एलपीजी कनेक्शन परत करावे लागणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.