उस्मानाबादचे ‘धाराशिव’ नामांतरणावर शिक्कामोर्तब ; केंद्र सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयात महत्वाची माहिती…!
मुंबई : उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण करण्यात येणार असल्याची महत्त्वाची माहिती बुधवारी केंद्र सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली आहे.
शिंदे व फडणवीस सरकारने जुलै २०२२ मध्ये औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ असे तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला होता.या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. मोहम्मद अहमद, अण्णासाहेब खंदारे आणि राजेश मोरे या तीन व्यक्तींनी मिळून ही याचिका दाखल केली आहे.
औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव बदलण्याचा प्रयत्न यापूर्वीही करण्यात आला असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने राजकीय फायद्यासाठी त्यांच्या मंत्रिमंडळाच्या अंतिम बैठकांमध्ये या दोन शहरांच्या नामकरणाचा ठराव बेकायदेशीरपणे मांडला. त्यानंतर १६ जुलै २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने या नामकरणावर शिक्कामोर्तब केले. मात्र राज्य सरकारचा हा निर्णय राज्यघटनेतील संबंधित तरतुदींचे उल्लंघन आहे. तसेच हा दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा दावाही याचिकाकर्त्यांनी केला आहे.
त्यानुसार उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी हायकोर्टाला दिली. तसेच औरंगाबादच्या नामकरणाचा प्रस्ताव हा विचाराधीन असल्याचेही यावेळी न्यायालयाला सांगितले.