विलिनीकरणाच्या पडद्याआड ‘ऑपरेशन टायगर’ची तयारी? अमित शाह पुण्यात येताच शिंदे गटाच्या मंत्र्याचा मोठा इशारा; महाराष्ट्रात नव्या राजकीय भूकंपाचे संकेत!


पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा रंगली असतानाच आता ‘ऑपरेशन टायगर’चीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुण्यात दाखल झाले असतानाच शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या सूचक विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गेल्या १५ ते २० दिवसांपासून वेगवेगळ्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू असल्याचे सांगत त्यांनी महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत दिले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासोबतच पडद्यामागे आणखी कोणती राजकीय खेळी सुरू आहे, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात त्यांच्या हस्ते दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. अजित पवार यांच्या कार्याची माहिती देणाऱ्या छायाचित्र दालनाचे उद्घाटन, त्यांच्या जीवनावरील लघुपट आणि कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन असे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.

संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?

अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना संजय शिरसाट यांनी महत्त्वपूर्ण विधान केले. ‘अमित शाह जिथे जातात, तिथे आपला ठसा उमटवतात. इतिहास पाहिला तर महाराष्ट्राच्या राजकारणात निश्चित काही घडामोडी घडतील. राजकीय समीकरणे असतील किंवा इतर बाबी असतील, अमित शाह यांच्या भेटीनंतर निश्चित चर्चा होईल,’ असे ते म्हणाले.

पुढे त्यांनी विलिनीकरण आणि ऑपरेशन टायगर या दोन्ही चर्चांचा उल्लेख केला. गेल्या १५ ते २० दिवसांपासून विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर ऑपरेशन टायगर आणि इतर राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे अमित शाह यांनी वेळ घेतला असावा, असे सूचक विधान शिरसाट यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून नेमकी कोणती राजकीय उलथापालथ होणार, याची उत्सुकता वाढली आहे.

रोहित पवारांच्या मफलर मॅनवरही भाष्य

दुसरीकडे, अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्रकरणावरूनही राजकीय वातावरण तापले आहे. आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणात मफलर मॅनचा उल्लेख केल्याने हा व्यक्ती नेमका कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर शिरसाट यांनी अजित पवारांचा मृत्यू घातपात होता की अपघात, याचा तपास पूर्ण होऊन हे प्रकरण निकाली निघाले पाहिजे, अशी भूमिका मांडली.

रोहित पवारांकडे या प्रकरणासंदर्भात काही माहिती असल्यास त्यांनी ती उघड करावी आणि पोलिसांना तपासात सहकार्य करावे. पोलीस त्यांना कायदेशीर सहकार्य करतील, असेही शिरसाट म्हणाले.

भाजपकडून रोहित पवारांवर निशाणा

दरम्यान, भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली आहे. रोहित पवारांना स्टंटबाजी करण्याची सवय असून चर्चेत राहण्यासाठी ते पत्रकार परिषदांच्या घोषणा करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मागील १० तारखेला पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले होते, आता पुन्हा पत्रकार परिषद घेण्याचे बोलले जात आहे. हा केवळ चर्चेत राहण्याचा प्रयत्न असल्याचे बन यांनी म्हटले.

विलिनीकरणाची चर्चा थांबेना; पार्थ पवारांच्या भेटीही चर्चेत

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. दोन्ही गटांकडून विलिनीकरणाबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असल्या, तरी चर्चांना पूर्णविराम मिळालेला नाही. शरद पवार रुग्णालयात दाखल झाल्यानंतर या चर्चांना अधिक वेग आला. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनीही दोन वेळा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यामुळे राजकीय चर्चांना आणखी बळ मिळाले.

आता अमित शाह यांचा पुणे दौरा, अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण, शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांचे विधान आणि ऑपरेशन टायगरचा उल्लेख या सगळ्या घडामोडी एकाच वेळी समोर आल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार की शिवसेनेच्या राजकारणातही नवे समीकरण आकाराला येणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!