पोलीस ठाण्यात प्रेयसीचा गोंधळ, काही वेळातच रेल्वे रुळावर उपनिरीक्षकाचा मृतदेह आढळला; नेमकं काय घडलं?


उत्तर प्रदेश : पोलीस दलातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील चितबडागाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक संदीप कुमार यांचा मृत्यू झाला आहे. धरमपूर रेल्वे ट्रॅकजवळ शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. या प्रकरणामागे प्रेमसंबंधातील वाद आणि मानसिक त्रासाची पार्श्वभूमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

संदीप कुमार हे मूळचे उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर जिल्ह्यातील रहिवासी होते. गेल्या ११ महिन्यांपासून ते चितबडागाव पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. शनिवारी सायंकाळी ७ ते ८ वाजण्याच्या सुमारास धरमपूर रेल्वे ट्रॅकजवळ ही घटना घडली. लोको पायलटने पुढील रेल्वे स्थानकावर माहिती दिल्यानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान मृत व्यक्तीची ओळख संदीप कुमार अशी पटली. घटनास्थळाजवळ त्यांची बुलेटही आढळून आली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक ईरज राजा यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला असून, कुटुंबीयांनाही घटनेची माहिती देण्यात आली आहे.

प्रेमसंबंधातून वाद; पोलीस ठाण्यात तरुणीचा गोंधळ

प्राथमिक माहितीनुसार, चितबडागाव पोलीस ठाण्यात येण्यापूर्वी संदीप कुमार हे उठाओ पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यावेळी त्यांची एका तरुणीशी ओळख झाली आणि पुढे दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र, काही काळानंतर त्यांच्यात वाद सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेच्या दिवशी संबंधित तरुणी चितबडागाव पोलीस ठाण्यात आली होती. तिथे तिने गोंधळ घातल्याचे सांगितले जात आहे. उपस्थित कर्मचाऱ्यांनी तिची समजूत काढून तिला परत पाठवले. त्यानंतर संदीप कुमार आणि संबंधित तरुणी वादावर तोडगा काढण्यासाठी गाझीपूर कोतवाली येथे कार्यरत पोलीस निरीक्षक दिनेश पाठक यांच्याकडे गेले होते. मात्र, त्यांच्यातील वाद मिटू शकला नाही.

वाद मिटला नाही; पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास

चर्चा निष्फळ ठरल्यानंतर संदीप कुमार परतत होते. याचदरम्यान धरमपूर रेल्वे ट्रॅकजवळ ही घटना घडली. प्रेमसंबंधातील वाद आणि मानसिक त्रासाची बाब या प्रकरणात समोर आली असली, तरी नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. बलिया पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!