दिवाळीसाठी माहेरी आली, जुना मित्र भेटायला गेला; पुण्यातील एअर हॉस्टेसची जंगलात हत्या, नेमकं काय घडलं?

पुणे : दिवाळी सणासाठी माहेरी आलेल्या पुण्यातील ३५ वर्षीय एअर हॉस्टेसची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्षा तुरकर असं मृत महिलेचं नाव असून, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात वैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर ही घटना घडली. सुरुवातीला लुटमारीच्या उद्देशाने हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात असला, तरी या प्रकरणात घातपाताची शक्यताही पोलिसांकडून तपासली जात आहे.
पुण्यात वास्तव्यास, दिवाळीसाठी आल्या होत्या माहेरी


मिळालेल्या माहितीनुसार, वर्षा तुरकर पुण्यात एअर हॉस्टेस म्हणून कार्यरत होत्या. २०२४ मध्ये त्यांनी समर सैयद यांच्याशी प्रेमविवाह केला होता. त्यानंतर हे दाम्पत्य पुण्यात वास्तव्यास होते. त्यांना अडीच वर्षांची मुलगी आहे. मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील किन्ही हे त्यांचे माहेर असून, दिवाळी साजरी करण्यासाठी त्या गावी आल्या होत्या.

मित्रासोबत नदीकाठी गेल्या अन् हल्ला झाला

शिक्षण घेत असताना वर्षा यांची गोंदिया येथील रितेश अग्रवाल याच्याशी मैत्री झाली होती. १४ नोव्हेंबर रोजी रितेश वर्षा यांच्या किन्ही गावात आला होता. त्यानंतर सायंकाळी दोघेही महाराष्ट्राच्या हद्दीतील बोंडरानी गावाजवळ वैनगंगा नदीच्या किनाऱ्यावरील मंदिर परिसरात फिरण्यासाठी गेले होते.
याचवेळी चेहऱ्यावर मास्क लावून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी वर्षा यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यांच्या पाठीवर वार करण्यात आल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.
दाजींना केला शेवटचा फोन; रुग्णालयात मृत घोषित
सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गंभीर जखमी अवस्थेत वर्षा यांनी त्यांचे दाजी पप्पू पटेल यांना फोन करून आपल्यावर हल्ला झाल्याची आणि लुटमार करण्यात आल्याची माहिती दिली. माहिती मिळताच पप्पू पटेल यांनी नातेवाईकांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर वर्षा यांना तातडीने मध्य प्रदेशातील खैरलांजी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सायंकाळी सातच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
लुटमारीचा बनाव की घातपात? पोलिसांकडून तपास सुरू
ही घटना महाराष्ट्राच्या हद्दीतील दौनीवाडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घडली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. लुटमारीच्या उद्देशाने हत्या झाली की यामागे आणखी काही कारण आहे, याचा शोध घेतला जात आहे.
घटनेच्या वेळी वर्षा यांच्यासोबत असलेला मित्र रितेश अग्रवाल आणि त्यांचे दाजी पप्पू पटेल यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, दोघांचीही कसून चौकशी सुरू आहे.
