धक्कादायक! ७५ वर्षीय आजीला लागलं रील्सचं व्यसन; तहान-भूक विसरल्या, मोबाईल काढताच केलं असं काही…

छत्रपती संभाजीनगर : मोबाइल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांना डिजिटल व्यसनाचा सामना करावा लागत आहे. याचाच एक धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात समोर आला आहे.
एका ७५ वर्षीय आजींना इन्स्टाग्रामवरील रील्स पाहण्याची इतकी सवय लागली की, त्यांना जेवण, पाणी आणि दैनंदिन कामांचाही विसर पडू लागला. प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. विशेष म्हणजे, उपचार सुरू असतानाही रुग्णालयात एक वेगळाच प्रकार घडला.


रील्स पाहण्याच्या नादात जेवण-पाण्याकडे दुर्लक्ष

सुरुवातीला मनोरंजनासाठी मोबाइलवर रील्स पाहण्यास सुरुवात केलेल्या आजी हळूहळू तासन्तास मोबाइलमध्ये गुंतून राहू लागल्या. मोबाइल हातात असताना जेवणाची वेळ झाली किंवा तहान लागली, तरी त्यांना त्याचे भान राहत नव्हते. कुटुंबीयांनी मोबाइलचा वापर कमी करण्याचा प्रयत्न केला असता त्या अस्वस्थ होत आणि घरात गोंधळ घालत असत. अखेर त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली.

रुग्णालयातही पाच मोबाइल गायब
आजींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिथेही एक अनपेक्षित प्रकार घडला. रुग्णालयातील पाच वेगवेगळ्या रुग्णांचे मोबाइल अचानक गायब झाले. प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, संबंधित आजींनी हे पाचही मोबाइल आपल्या पिशवीत ठेवल्याचे समोर आले. या घटनेमुळे रुग्णालयात एकच चर्चा सुरू झाली. सलग १५ दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.
मोबाइलच्या अतिवापराबाबत तज्ज्ञांचा इशारा
मोबाइलचे व्यसन केवळ लहान मुले आणि तरुणांपुरते मर्यादित राहिलेले नाही. ज्येष्ठ नागरिकांमध्येही मोबाइलचा अतिवापर वाढत असल्याचे मनोविकारतज्ज्ञ डॉ. मेराज कादरी यांनी सांगितले. ज्येष्ठ व्यक्ती मोबाइलवर अधिक वेळ घालवत असल्याचे दिसल्यास कुटुंबीयांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
