महाराष्ट्रात थंडी की पाऊस? ‘अकबन’ चक्रीवादळामुळे हवामानात मोठा बदल; पुढील ५ दिवसांचा अंदाज


पुणे : राज्यात सध्या हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. पहाटे आणि सकाळच्या वेळी उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे गारठा वाढू लागला आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि घाटमाथ्याच्या भागात तापमानाचा पारा घसरत असल्याने थंडीची चाहूल लागली आहे. मात्र, दुपारच्या वेळी उन्हाचा चटका कायम असल्याने नागरिकांना दुहेरी हवामानाचा अनुभव येत आहे.

दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या ‘अकबन’ चक्रीवादळामुळे राज्याच्या हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. १९ नोव्हेंबरच्या आसपास विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील पाच दिवस राज्यात पावसाचा अंदाज नसला, तरी चक्रीवादळाची दिशा बदलल्यास विदर्भातील हवामानावर परिणाम होऊ शकतो.

स्कायमेटचे हवामान तज्ज्ञ महेश पलावत यांच्या माहितीनुसार, उत्तरेकडील डोंगराळ भागात पाऊस कमी झाला आहे. मात्र, आगामी काळात उत्तरेकडे पुन्हा चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही भागांत बर्फवृष्टी आणि पावसाचे वातावरण तयार होऊ शकते. उत्तरेकडून वाहणारे थंड वारे महाराष्ट्राच्या दिशेने सरकत असल्याने राज्यात सकाळच्या वेळी गारठा जाणवत आहे.

दुसरीकडे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून, त्यातून ‘अकबन’ चक्रीवादळाची निर्मिती होत आहे. या वादळाचा परिणाम आंध्र प्रदेशच्या आसपास जाणवण्याची शक्यता असून, हवामान विभागाच्या अंदाजानुसार ते म्यानमारच्या दिशेनेही सरकू शकते. अरबी समुद्रातही चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण होत आहे.

महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता नसल्याने बहुतांश भागांत कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. मात्र, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पहाटे आणि सकाळी तापमानात घट होत आहे. उत्तर महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर गारठा वाढू लागला असून, काही ठिकाणी शेकोट्याही पेटू लागल्या आहेत. दुसरीकडे दुपारच्या वेळी तापमान वाढत असल्याने उन्हाचा त्रास कायम आहे.

एल निनोमुळे कडाक्याची थंडी कमी राहणार?

१९ नोव्हेंबरच्या आसपास चक्रीवादळाचा प्रभाव जाणवण्याची शक्यता असल्याने विदर्भात पाऊस पडू शकतो. मात्र, वादळाची दिशा बदलल्यास पावसाची शक्यता कमी होईल. यंदा मागील वर्षाप्रमाणे कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता कमी असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे. एल निनोचा प्रभाव मार्च-एप्रिलपर्यंत राहण्याची शक्यता असल्याने यंदाच्या हिवाळ्यातील थंडीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!