चाकण बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात वाढ, शेतकऱ्यांनो जाणून घ्या बाजारभाव…

चाकण : चाकण येथील बाजारात कांद्याचे दर वाढल्याचे दिसून आले आहे. यामध्ये एकूण आवक ४,५०० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक १,५०० क्विंटलने घटल्याने भावात ५०० रुपयांची वाढ झाली. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

कांद्याचा कमाल भाव २,५०० रुपयांवरून ३ हजार रुपयांवर पोहोचला आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये लसूण, हिरवी मिरची व काकडीची विक्रमी आवक झाली. यामध्ये कारली, आले व बटाट्याचे भाव स्थिर राहिले आहेत.
तसेच बाजारात ओल्या भुईमूग शेंगांची आवक सुरू झाली आहे, तसेच पालेभाज्यांची भरपूर आवक झाल्याने पालेभाज्यांचे भाव गडगडले आहेत. यामध्ये एकूण उलाढाल ५ कोटी ९० लाख रुपये झाली. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या मार्केटमध्ये बटाट्याची एकूण आवक १,५०० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक १ हजार क्विंटलने घटूनही कमाल भाव २,००० रुपयांवर स्थिर राहिले. तसेच लसणाची एकूण आवक २५ क्विंटल झाली. ही आवक वाढल्याचे दिसून आले आहे.
गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक १५ क्विंटलने वाढल्याने भावात ८ हजार रुपयांची घट झाली. लसणाचा कमाल भाव २५,००० रुपयांवरून १७ हजार रुपयांवर स्थिरावला. काही दिवसांपूर्वी लसणाचे भाव हे गगनाला भिडले होते. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता.
तसेच हिरव्या मिरचीची एकूण आवक ३८२ क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला ३ हजार रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. ओल्या भुईमूग शेंगांची एकूण आवक ३ क्विंटल झाली असून, या शेंगांना ८ हजार रुपयांपर्यंत कमाल भाव मिळाला. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.