हमीभावाने खरेदी करण्यात येणाऱ्या कांद्याच्या दरात पुन्हा वाढ, शेतकऱ्यांना दिलासा…

नाशिक : नाफेडमार्फत शासकीय हमीभावाने खरेदी करण्यात येणाऱ्या कांद्याच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. आता २१२५ वरून पुन्हा २३३५ रुपये प्रति क्विंटल या दराने कांद्याची खरेदी करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेऊन आंदोलन केले होते. याबाबत ते म्हणाले, हे एकजुटीने रस्त्यावर उतरणाऱ्या शेतकऱ्यांचं यश आहे, परंतु हंगामाच्या सुरुवातीला नाफेडची खरेदी सुरू होण्यापूर्वी अनेक शेतकऱ्यांनी कवडीमोल भावाने कांदा विकला आहे.

या शेतकऱ्यांना वाहतूक खर्च भागेल इतकेही पैसे कांदा विक्रीतून मिळाले नाहीत, उत्पादन खर्च वसूल होणं तर दूरच. त्यामुळं नाफेडी कांदा खरेदी सुरू होण्यापूर्वी बाजार समितीत मातीमोल भावाने कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना अनुदान दिलं पाहिजे ही आमची मागणी आजही कायम आहे.


त्यामुळं शेतकऱ्यांचा अधिक अंत न पाहता नाफेडची कांदा खरेदी सुरू होण्यापूर्वी बाजार समितीत विक्री झालेल्या कांद्याला भरीव अनुदान देण्याचा निर्णय सरकारने तातडीने घ्यावा, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या काळात अजून मदत सरकार करणार का हे पाहणे महत्वाचे आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी कांद्याला बाजारभाव नसल्याने आमदार रोहित पवार यांनी आंदोलन करून सरकारकडे मागणी केली होती. यानंतर दरात काहीशी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. आता पावसाने देखील ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत आहेत.