व्हायरल होण्याचा नाद भोवला! थार-फॉर्च्यूनरसह ४ गाड्या जप्त, प्रत्येकी ५० हजारांचा दंड
लेह : सोशल मीडियावर अधिकाधिक लाइक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी लडाखच्या निसर्गरम्य परिसरात धोकादायक स्टंट करणाऱ्या चार पर्यटकांना प्रशासनाने चांगलाच धडा शिकवला आहे. पर्यावरण आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चार वाहनचालकांवर प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून त्यांच्या चारही गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. लडाखमध्ये अशा स्वरूपाची कठोर कारवाई प्रथमच झाल्याचे सांगितले जात आहे.

पँगॉन्ग तलाव, चांगथांग कोल्ड डेझर्ट वन्यजीव अभयारण्य, काराकोरम वन्यजीव क्षेत्र आणि नुब्रा खोऱ्यातील संवेदनशील भागांमध्ये काही पर्यटकांनी ऑफ-रोडिंग, स्टंटबाजी आणि वन्यजीवांना त्रास देणारे प्रकार केल्याचे समोर आले होते. विशेष म्हणजे या घटना लपून राहिल्या नाहीत. उलट संबंधितांनी स्वतःच सोशल मीडियावर अपलोड केलेल्या रील्स आणि व्हिडिओंमुळे प्रशासनाला पुरावे मिळाले.
२३ जून रोजी पंजाब नोंदणीची महिंद्रा थार पँगॉन्ग तलावाच्या पाण्यात उतरवून स्टंट करण्यात आला. तलावाच्या नैसर्गिक परिसंस्थेला धोका निर्माण करणाऱ्या या प्रकाराचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर वनविभागाने तपास सुरू करत संबंधित वाहनचालकावर कारवाई केली.

याचप्रमाणे २१ जून रोजी उत्तर प्रदेश नोंदणीची एसयूव्ही चांगथांग कोल्ड डेझर्ट वन्यजीव अभयारण्याच्या हद्दीत बेकायदेशीर ऑफ-रोडिंग करताना आढळली. संरक्षित क्षेत्रात वाहन चालवल्यामुळे वन्यजीवांच्या अधिवासावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे वाहन जप्त करण्यात आले.

२० जून रोजी काराकोरम वन्यजीव क्षेत्रातील नदीच्या पात्रातून आणखी एका थारने धोकादायक मार्गक्रमण केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर प्रशासनाने वाहनाचा शोध घेत कारवाई केली.
दरम्यान, सर्वाधिक गंभीर घटना १७ जून रोजी घडली. हिमाचल प्रदेश नोंदणीच्या टोयोटा फॉर्च्यूनरने दुर्मिळ तिबेटी गझेल या वन्यप्राण्याचा पाठलाग केल्याचे आढळून आले. या प्रकारामुळे वन्यजीव संरक्षण यंत्रणा सतर्क झाली. पोलिस आणि वनविभागाने संयुक्त मोहीम राबवत वाहनाचा शोध घेतला आणि अखेर हान्ते परिसरातील एका होमस्टेमधून ते ताब्यात घेतले.
लेह वाइल्डलाईफ विभागाच्या अखत्यारितील मेराक, लुकुंग, नुरबू ला आणि सुमुर या संवेदनशील भागांत हे नियमभंग झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. पर्यटनाच्या नावाखाली पर्यावरण, जलस्रोत आणि वन्यजीवांना धोका निर्माण करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. सोशल मीडियासाठी केलेली काही मिनिटांची स्टंटबाजी संबंधित पर्यटकांना मात्र हजारो रुपयांचा दंड आणि वाहन जप्तीच्या स्वरूपात चांगलीच महागात पडली.