गोकुळनंतर सातारा जिल्हा बँकेतही सत्तेचा नवा पेच! जयकुमार गोरेंचा थेट फडणवीसांकडे चेंडू, शंभूराज देसाईंचा पलटवार; अध्यक्षपदासाठी महायुतीत संघर्ष अटळ?

सातारा : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर आता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून महायुतीमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, असे स्पष्ट केले आहे. मात्र, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्थानिक पातळीवरच निर्णय व्हावा, अशी भूमिका घेत त्यांच्या विधानाला प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे १८ तारखेला होणाऱ्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सातारा जिल्हा बँकेच्या २१ जागांपैकी १० जागांवर महायुतीने एकत्रित निवडणूक लढवली होती. उर्वरित ११ जागांवर भाजपविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असा सामना झाला. निकालात भाजपला ९, राष्ट्रवादीला ८, तर शिवसेनेला ४ जागा मिळाल्या. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीत तिन्ही पक्षांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
दरम्यान, सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतही महायुतीमधील मतभेद उघड झाले होते. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे एकत्रित संख्याबळ अधिक असूनही भाजपने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ही दोन्ही पदे मिळवली. निवडणुकीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांवर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी शंभूराज देसाई, मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील यांच्यासोबत पोलिसांची धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणाचे पडसाद विधान परिषदेतही उमटले होते. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन्ही मंत्र्यांशी चर्चा करून महायुतीतील नेत्यांचा सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही दिली होती.

आता जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून पुन्हा मतभेद समोर आले आहेत. जयकुमार गोरे यांच्या मते, अध्यक्ष कोण होणार याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील. याउलट शंभूराज देसाई यांनी स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची मागणी केली. वरिष्ठ नेतृत्वाने हस्तक्षेप करायचाच असल्यास दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचाही त्यात सहभाग असावा, असेही त्यांनी सूचित केले.

राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र, पक्षाचे आठ संचालक असल्याने अध्यक्षपदाच्या समीकरणात त्यांचे महत्त्व कमी नाही. भाजप अध्यक्षपद स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करणार की मित्रपक्षाला संधी देणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कोल्हापुरातील गोकुळ दूध संघात मित्रपक्षाचे माजी आमदार राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर साताऱ्यातही तशीच तडजोड होणार का, याची उत्सुकता आहे. जिल्हा परिषदेत भाजपने मित्रपक्षांवर मात केली होती. त्यामुळे यावेळीही भाजप आपले वर्चस्व कायम ठेवणार की महायुतीतील घटक पक्षांना संधी देणार, हे १८ तारखेला स्पष्ट होईल. तोपर्यंत साताऱ्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
