देशातील मोठ्या खासगी बँकेचा ग्राहकांना झटका; कर्जाचे व्याजदर वाढले, EMI मध्ये होणार वाढ…

मुंबई : देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकांपैकी एक असलेल्या HDFC बँकेने कर्जदारांना मोठा धक्का दिला आहे. बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

बँकेने सातही मुदतींच्या MCLR दरांमध्ये ५ ते १५ बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. नवीन दर ७ नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत. या निर्णयाचा परिणाम MCLR शी जोडलेल्या गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि इतर फ्लोटिंग रेट कर्जांवर होणार आहे.
MCLR दरात किती वाढ?

HDFC बँकेने MCLR दर ७.७५ टक्क्यांवरून वाढवून ७.८५ ते ८.७० टक्क्यांच्या दरम्यान केले आहेत. यापूर्वी हे दर ७.७५ ते ८.५५ टक्क्यांदरम्यान होते. विशेष म्हणजे बँकेने दीर्घ मुदतीच्या कर्जदरांमध्येही वाढ केली आहे.

१५ बेसिस पॉइंट्सची वाढ
बँकेने सहा महिने, एक वर्ष, दोन वर्षे आणि तीन वर्षांच्या MCLR दरांमध्ये १५ बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. तर इतर मुदतींच्या दरांमध्ये ५ ते १० बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली आहे. एक बेसिस पॉइंट म्हणजे ०.०१ टक्के.
EMI किती वाढणार?
समजा, एखाद्या ग्राहकाने २० लाख रुपयांचे गृहकर्ज २० वर्षांच्या मुदतीसाठी घेतले आहे आणि त्यावरील व्याजदर ८ टक्के आहे. अशा परिस्थितीत व्याजदर वाढून ८.१५ टक्के झाल्यास त्याच्या मासिक EMI मध्ये वाढ होईल.
८ टक्के व्याजदराने EMI : १६,७२९ रुपये
८.१५ टक्के व्याजदराने EMI : १६,९१६ रुपये
मासिक हप्त्यातील वाढ : १८७ रुपये
म्हणजेच ग्राहकाला दरमहा अधिक रक्कम भरावी लागणार आहे.
कोणत्या ग्राहकांना बसणार फटका?
MCLR दरवाढीचा परिणाम प्रामुख्याने ज्या ग्राहकांची गृहकर्जे, वैयक्तिक कर्जे, वाहन कर्जे किंवा इतर फ्लोटिंग रेट कर्जे MCLR शी जोडलेली आहेत, त्यांच्यावर होणार आहे.
मात्र, सर्वच ग्राहकांच्या EMI मध्ये लगेच वाढ होईल असे नाही. ग्राहकांचे कर्ज कोणत्या बेंचमार्कशी जोडलेले आहे आणि कर्जाच्या करारानुसार व्याजदर पुन्हा निश्चित करण्याची तारीख कधी आहे, यावर प्रत्यक्ष परिणाम अवलंबून असेल.
