विलीनीकरणाची चर्चा सुरू असतानाच बीडमध्ये मोठी घडामोड; दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकत्र, नेमकं काय घडलं?

बीड : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेने जोर धरला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीगाठी आणि दोन्ही गटांतील नेत्यांकडून करण्यात येणाऱ्या विधानांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अशातच आता बीडमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी एकाच कार्यक्रमात एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.

बीडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकत्र
राज्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, याबाबत चर्चा सुरू असतानाच बीड तालुक्यातील मनकर्णिका धरणावर आयोजित गाळपेरा कार्यक्रमात दोन्ही गटांचे नेते एकत्र आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित यांची यावेळी भेट झाली.

या कार्यक्रमात खासदार बजरंग सोनवणे यांनी पेरणी केली, तर आमदार विजयसिंह पंडित यांनी कासरा धरला. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांची विचारपूस केली. तसेच त्यांच्यात काही वेळ गप्पाही रंगल्या. त्यामुळे या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा वेग
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा सुरुवात झाली.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही याबाबत मोठे विधान केले होते. सध्या विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा नसल्याचे सांगतानाच, अजित पवार हयात असते तर १२ फेब्रुवारीलाच दोन्ही पक्षांचे विलीनीकरण झाले असते, असे त्यांनी म्हटले होते.
दुसरीकडे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या विलीनीकरणाबाबत फारशा उत्सुक नसल्याची चर्चा सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. तसेच शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठकांचे सत्र सुरू असून, पार्थ पवार यांनीही त्यांची दोनदा भेट घेतली आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये दोन्ही गटांचे लोकप्रतिनिधी एकत्र आल्याने राजकीय चर्चांना आणखी रंग चढला आहे. मात्र, या भेटीमागे कोणतेही राजकीय कारण असल्याचे स्पष्ट झालेले नाही.
