ओबीसी बहुजन पार्टीची दौंडला बैठक! प्रकाश शेंडगेंनी बारामती लोकसभेतून महेश भागवतांना दिली उमेदवारी..!!


दौंड : ओबीसी बहुजन पार्टीच्या सुकाणू समितीची बैठक २९ मार्च रोजी पार पडली. या बैठकीत पक्षाच्या वतीने लोकसभा निवडणूक २०२४ साठी नऊ मतदारसंघात उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये सांगली लोकसभा मतदारसंघात ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष प्रकाश (आण्णा) शिवाजीराव शेंडगे, बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनीती पवार या घराणेशाही च्या विरोधात महेश सिताराम भगवत यांना रिंगणात उतरवले आहे.

परभणी मतदार संघात ओबीसी नेते आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्या विरोधात ऍड. हरिभाऊ शेळके दंड थोपटणार आहेत. तसेच हिंगोली मतदार संघात ऍड रवी यथवंतराव शिंदे, नांदेड मतदारसंघात ऍड अविनाश विश्वनाथ भोसीकर, यवतमाळ मतदारसंघात प्रशांत महादेव बोडसे, बुलढाणामध्ये नंदू जगन्नाथ लवंगे, अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या शिर्डी मतदारसंघात डॉ. अशोक रामचंद्र आल्हाट, तर हातकणंगले मतदारसंघात मनीषा डांगे व प्रा. संतोष कोळेकर या दोघांना उमेदवारी जाहीर केली आहे.

अर्थात कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून श्रीमंत शाहूमहाराज छत्रपती आणि अकोला लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. ओबीसी बहुजन पार्टीने नऊ जागांवर उमेदवार जाहीर केल्यानंतर त्यांची पहिली सभा आणि कार्यकर्ता मेळावा बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड तालुक्यातील केडगाव (चौफुला) येथे रविवारी ( दि ३१) सायंकाळी ४ वाजता होणार आहे.

या सभेसाठी ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे, उपाध्यक्ष टी.पी .मुंडे, कुणबी सेनेचे नेते आणि ओबीसी बहुजन पार्टीचे सरचिटणी बावकर , आगारी समाजाचे नेते जे. डि. तांडेल हे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात आणि ओबीसी बहुसंख्य असलेल्या दौंड मतदारसंघात ओबीसी बहुजन पार्टीच्या या सभेकडे सर्व राजकीय पक्षांच्या नजरा लागल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!